भाजपने केला निषेध; घटनेच्या मुळाशी जावू चौकशी करा- विलासराव जगताप
जत प्रतिनिधी
उत्तरप्रदेश राज्यातील मथुरेच्या चार साधूंना मुले पळवणारी टोळी समजून गंभीर मारहाण केल्याप्रकरणी राज्याच्या गृहविभागाकडून चांगलीच दखल घेण्यात आली असून लवंगा सरपंचासह दहा ते बारा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सहाजणांना तातडीने अटक करण्यात आली आहे. तर याप्रकरणी माजी आमदार तथा भाजप नेते विलासराव जगताप यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. या घटनेच्या मुळाशी जाऊन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबूले, उपाधीक्षक रत्नाकर नवले व पोलीस महासंचालकाचे पथकांनी भेट दिली आहे. या घटनेनंतर जत तालुक्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सरपंच आमसिद्ध तुकाराम सलगर, लहू लोखंडे, मुत्तप्पा वडीयार, आप्पा पवार, भाऊसाहेब शिंदे, खंडू टिळे, यांच्यासह पंचवीस लोकांवर उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली. यापैकी सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस व घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी उत्तरप्रदेश मधील मथुरेतील साधू संथ जत तालुक्यातील लवंगा गावातून कर्नाटक विजापूर येथे दर्शनासाठी निघाले होते. रस्ता विचारण्यासाठी साधूंनी लवंगा येथे लहान शाळकरी मुलाकडे चौकशी केली. तेथील काही ग्रामस्थांना हे साधू बहरूपी असून लहान मुलांना पळवणारी टोळी आहे, असा गैरसमज करून घेऊन त्यांना पट्टा, काठीने बेदम मारहाण केली.
दरम्यान, काही नागरिकांनी मारहाणीचा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला. यानंतर ग्रामस्थांनी उमदी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी त्या साधूना ताब्यात घेत त्यांच्याकडे व मथुरेतील मठामध्ये त्यांची चौकशी केली असता साधू देव दर्शनासाठी विजापूरच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी देखील साधूना तक्रार दाखल करण्याची विचारणा केली. मात्र, त्यांनी दर्शनासाठी जायचे असल्याने तक्रार देण्यास नकार दिला.
दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले असून गृहविभागाने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलीस महासंचालकाचे पथक व खूद्द पोलीस अधीक्षक गेडाम यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची कसून चौकशी केली आहे. यामध्ये सरपंचासह पंचवीस लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मारहाणीची घटना गैरसमजुतीतून….!
लवंगा गावातील घटना प्रथमदर्शनी मुल पळवणारी टोळी असल्याच्या गैरसमजुतीतून झाल्याचे दिसून येते. पुढील तपासात सत्य समोर येईल. मात्र, ज्या लोकांनी कायदा हातात घेतला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. संशयास्पद असेल तर पोलिसांशी संपर्क साधा. कायदा हातात घेऊ नये. साधूंशी संपर्क साधला असता त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.
दीक्षित गेडाम, पोलीस अधीक्षक, सांगली








