एकाच दिवसात बालिकेसह सहा जणांचा घेतला चावा : ग्राम पंचायतीने बंदोबस्त करण्याची मागणी
बेळगाव : सावगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी चार वर्षांच्या बालिकेसह आणखी सहा जणांचा कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्याने आठ दिवसांत अनेक जणांचा चावा घेतला असला तरीही ग्राम पंचायतीने कुत्र्याचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. रियांशी सागर जाधव (वय 4, रा. तानाजी गल्ली), वैष्णवी अकनोजी (वय 40, रा. मरगाई गल्ली), स्नेहल मुंगले (वय 24, रा. तानाजी गल्ली), रेणुका अशोक कदम (वय 55, रा. तानाजी गल्ली) अशी कुत्र्याने चावा घेतलेल्या जखमींची नावे आहेत. या सर्वांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर अन्य दोघांची नावे समजू शकली नाहीत. ते दोघेही गुरुवारी सायंकाळी मोटारसायकलवरून जाताना त्यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला आहे. ते परगावातील असल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत.
सावगाव व परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचे कळप जिकडे तिकडे फिरताना पहावयास मिळत आहेत. मात्र, कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासह त्यांचा बंदोबस्त करण्याकडे ग्राम पंचायतीने मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. त्यातच गेल्या आठ दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्याने गावात धुमाकूळ घातला आहे. रस्त्यात दिसेल त्याचा चावा घेतला जात आहे. सातत्याने चावा घेण्याच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चावा घेतलेल्यांवर जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. गुरुवारी सकाळच्या दरम्यान घरासमोर थांबलेल्या रियांशी या चार वर्षीय बालिकेच्या मानेला आणि कानशिलाला चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. वैष्णवी अकनोजी व स्नेहल मुंगले हिच्याही पायाचा चावा घेतला. तसेच रेणुका कदम यांच्या कंबरेचा कुत्र्याने घेतला आहे. पिसाळलेला कुत्रा घरात शिरेल या भीतीने अनेक जणांनी घराचे दरवाजे बंद केले आहेत. त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेला पाठवून देताना पालकांना विचार करण्याची वेळ आली आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध सुऊ
गावातील काही तरुणांनी पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेतला. मात्र तो सापडू शकला नाही. या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी बेनकनहळ्ळी ग्रा. पं. व तालुका पंचायतीकडे केली आहे. कुत्र्याच्या बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने अन्य काही कुत्र्यांचाही चावा घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेमकी किती कुत्रे पिसाळली आहेत हे समजणे कठीण झाले आहे.









