वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नियंत्रण रेषेनजीक पाकिस्तानचे सहा ड्रोन्स भारतीय सैनिकांच्या दृष्टीस पडल्याने सीमेवरील गस्त वाढविण्यात आली आहे. भारताच्या सुरक्षा दलांनी या घटनेनंतर व्यापक शोध अभियान हाती घेतले आहे. हे ड्रोन्स बालाकोट, लांगोटे आणि गुरसाई या मेंढार विभागातल्या प्रदेशांमध्ये आढळून आले आहेत. त्यांनी भारताची सीमा ओलांडलेली नाही. तथापि, ते भारतीय सीमेच्या नजीक दिसून आल्याने भारताकडून सावधानता बागळली जात आहे.
हे ड्रोन्स देखरेखीकरिता पाठविले असण्याची शक्यता आहे. ते आकाशात बऱ्याच उंचीवर आढळले. तसेच पाच ते दहा मिनिटांमध्ये ते त्यांच्या तळांवर परतले. ही घटना रविवारी रात्री सव्वानऊच्या आसपास घडली आहे. भारतीय सैन्यदलांनी या घटनेची गंभीर नोंद घेतली असून पहाटेपासूनच सीमावर्ती भागांमध्ये देखरेख वाढविण्यात आली आहे. पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्याला भारताने ‘सिंदूर अभियाना’च्या माध्यमातून दिलेले कंबरतोड प्रत्युत्तर यानंतर प्रथमच असे पाकिस्तानचे ड्रोन्स दृष्टीस पडल्याने भारताने सज्जता वाढविली आहे. पाकिस्तान अलिकडच्या काळात भारतात अवैध शस्त्रे आणि अंमली पदार्थ यांची तस्करी करण्यासाठी ड्रोन्सचा उपयोग करीत आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात या घटनेनंतर भारतीय सैनिक आणि अर्धसैनिकांनी आपला पहारा वाढविला आहे.









