दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींकडून घोषणा : जानेवारी 2024 पासून अधिकृत सदस्यत्व
‘ब्रिक्स’मध्ये समाविष्ट झालेले देश : अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती
वृत्तसंस्था /जोहान्सबर्ग
ब्रिक्समध्ये सहा नवीन देश सामील होण्यासंबंधीची घोषणा गुरुवारी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांनी केली. इजिप्त, सौदी अरेबिया, युएई, इथिओपिया, अर्जेंटिना आणि इराण या देशांना ‘ब्रिक्स’मध्ये प्रवेश देण्यात आला आहे. हे सर्व देश जानेवारी 2024 पासून अधिकृत सदस्य असतील. ब्रिक्सचा विस्तार करण्याच्या निर्णयामुळे बहुध्रुवीय जगातील अनेक देशांचा विश्वास आणखी दृढ होईल. ब्रिक्सच्या विस्ताराला भारताने नेहमीच पूर्ण पाठिंबा दिला आहे. नवीन सदस्यांची भर पडल्याने गट आणखी मजबूत होईल, असे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांनी जोहान्सबर्ग येथे तीन दिवसीय ब्रिक्स परिषदेच्या शेवटी समूहाच्या विस्ताराबाबत निर्णय जाहीर केला. ब्रिक्स समूहाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत परिषदेतील निर्णयांची माहिती देताना विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. आम्ही ब्रिक्सच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. समूहातील नवीन सदस्य देशांसोबत काम करून आम्ही ब्रिक्सला नवीन गतिमानता देऊ शकू, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. ब्रिक्सच्या विस्तारासाठी मार्गदर्शक तत्त्वे, मानके, निकष, कार्यपद्धती यावर सर्व देशांचे एकमत झाल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. तर, ब्रिक्सच्या विस्तारामुळे समूहाच्या सहकार्य यंत्रणेला नवीन गती मिळेल असे स्पष्ट करतानाच विस्तारामुळे ब्रिक्सचा एकता आणि सहकार्याचा निर्धार दिसून येतो, असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले.
‘बिक्स’मध्ये कोणते देश?
ब्रिक्समध्ये पाच देशांचा समावेश आहे. ‘ब्रिक्स’ हा जगातील पाच सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा समूह आहे. त्यांच्या नावांची पहिली अक्षरे एकत्र करून ‘ब्रिक्स’ची स्थापना करण्यात आली आहे. ‘बीआरआयसीएस’ मध्ये बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे भारत, सी म्हणजे चीन आणि एस म्हणजे दक्षिण आफ्रिका अशा पाच देशांचा समावेश आहे.









