डीसीआरबी विभागाची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
केपीटीसीएल कनि÷ अभियंता परीक्षेत झालेल्या घोटाळय़ा प्रकरणी आणखी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 29 वर पोहोचली असून पीएसआय परीक्षा घोटाळय़ापाठोपाठ बेळगावसह संपूर्ण राज्यात या घोटाळय़ाची चर्चा सुरू आहे.
अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी ही माहिती दिली आहे. डीसीआरबी विभागाचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून अटक करण्यात आलेल्या सर्व सहा जणांना गोकाक येथील जेएमएफसी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
गुरुवारी अटक करण्यात आलेल्या सर्व सहा जणांनी
इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर करून परीक्षा लिहिली आहे. त्यांच्याजवळून इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, मायक्रो चीप, मोबाईल व इतर वस्तू जप्त करण्यात आल्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले. या प्रकरणी आणखी धरपकड सुरूच राहणार आहे.
ईरण्णा मल्लाप्पा बंकापूर (वय 26, रा. बगरनाळ, ता. गोकाक), आदिलशा सिकंदर ताशेवाले (वय 23, रा. बटकुर्की, ता. रामदुर्ग), महांतेश हणमंत होसुप्पार (वय 22, रा. खानट्टी, ता. मुडलगी), महालिंग भीमाप्पा कुरी (वय 30, रा. नागनूर, ता. मुडलगी), शिवानंद रामाप्पा कुमोजी (वय 22, रा. बगरनाळ, ता. गोकाक), सुंदर शिवानंद बाळीकाई (वय 23, रा. मेळ्ळीकेरी, ता. सौंदत्ती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 7 ऑगस्ट 2022 रोजी ही परीक्षा झाली होती.









