कोंडुसकोप्प-खमकारहट्टी गावात चोरांचा उच्छाद
बेळगाव : बेळगाव शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही चोऱ्यांचा सपाटा सुरूच आहे. कोंडुसकोप्प, खमकारहट्टी परिसरात एका रात्रीत सहा घरे फोडण्यात आली असून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. चोरट्यांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनांची नोंद झाली आहे. बेळगावात तर चोऱ्या घरफोड्यांपाठोपाठ वाहने चोरण्याच्या घटना वाढल्या आहेत. आता तालुक्यातील गावातही चोऱ्या वाढल्या आहेत. चोरटे बंद घरांना लक्ष्य बनवत आहेत. सुवर्ण विधानसौधपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोंडुसकोप्प व खमकारहट्टी येथे एका रात्रीत सहा घरे फोडण्यात आली आहेत. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक एस. के. होळेण्णावर, उपनिरीक्षक बी. के. मिटगार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
कोंडुसकोप्प येथील शंकर पिराजी करगुप्पीकर यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून दोन तोळे सोन्याचे दागिने, 12 तोळे चांदी पळविली आहे. तर भीमसेन नागाप्पा करगुप्पीकर यांचे घर फोडून दोन तोळे सोने, 9 तोळे चांदी व 30 हजार रुपये रोकड पळविण्यात आली आहे. त्याच गावातील खादी भांडारमध्ये चोरीचा प्रयत्न झाला आहे. गंगाप्पा निंगाप्पा सांबरेकर यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून दोन तोळे सोने, 10 तोळे चांदी व 15 हजार रुपये रोख रक्कम एका खोलीतून तर दुसऱ्या खोलीतून 20 तोळे चांदी व 40 हजार रुपये रोख रक्कम पळविण्यात आली आहे. याच गावातील नागाप्पा लक्ष्मण सांबरेकर यांचे घर फोडून किमती वस्तूंसाठी घरातील साहित्य विस्कटून टाकण्यात आले आहे. नागाप्पा नोकरीनिमित्त परगावी असतात. चोरीच्या या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोंडुसकोप्प येथून एक पल्सर मोटरसायकलचीही चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. दोन दिवसांपूर्वी बस्तवाडमधून पॉवर ट्रिलर चोरण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच कोंडुसकोप्पमध्ये मोटरसायकलची चोरी झाली आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. खमकारहट्टी येथील शकील सनदी यांचे घर फोडण्यात आले आहे. त्यांच्या घरातून अडीच तोळे सोने, 5 तोळे चांदी चोरट्यांनी पळविली आहे. यासंबंधी सोमवारी रात्री हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता किरकोळ घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.









