लाखो रुपयांचे नुकसान : शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा प्रश्न गंभीर : नुकसानभरपाई देण्याची मागणी
बेळगाव : बेकिनकेरे येथे शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत सहा गवतगंज्या जळून खाक झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. या घटनेने खळबळ माजली आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने इतर गवतगंज्यांचे नुकसान टळले आहे. य् ाsथील डोंगर क्षेत्रात साठवून ठेवण्यात आलेल्या गवतगंज्यांना आग लागली. सोमनाथ मारुती सावंत या शेतकऱ्याच्या दोन, कृष्णा मारुती सावंत या शेतकऱ्याच्या तीन तर नागो आप्पाजी यळ्ळूरकर या शेतकऱ्याची एक गवतगंजी भस्मसात झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर आता चाराप्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाळ्यातच गवतगंज्यांना आग लागून चाऱ्याचे नुकसान झाल्याने आता जनावरांना काय घालावे? या चिंतेत नुकसानग्रस्त शेतकरी आहेत. त्यामुळे प्रशासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरून आहे.
शेतकरी वेळेत पोहोचल्याने इतर गंज्यांचे नुकसान टळले
बेकिनकेरे-अगसगा मार्गाशेजारी हा सुका चारा शेतकऱ्यांनी साठवून ठेवला होता. दरम्यान, दुपारी आगीचे लोळ निदर्शनास येताच हा प्रकार कळून आला. काही शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी धाव घेण्याआधीच गंज्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. मात्र, शेतकरी वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने इतर गंज्यांचे नुकसान टळले आहे. दरवर्षी उन्हाळ्याला सुरुवात झाली की गवतगंज्यांना आग लागण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे दरवर्षीच शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. यासाठी कृषी खाते आणि प्रशासनाने योग्य उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे.
भरपाई देण्याची मागणी
कृष्णा सावंत, सोमनाथ सावंत आणि नागो यळ्ळूरकर यांच्याकडे जनावरांची संख्या अधिक आहे. दुधाचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह चालवतात. मात्र, अचानक जनावरांचा सुका चाराच जळाल्याने आता जनावरांना काय घालावे? असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे तलाठी, ग्राम पंचायत, कृषी उत्पन्न बाजार समितीने लक्ष देऊन भरपाईसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









