देवरुख :
नागरी सुविधा अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी संगमेश्वर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींना सीएनजी घंटागाड्या मिळाल्या आहेत. याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या घंटागाड्या ग्रामस्थांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.
तालुक्यात १९६ गावे व १२६ ग्रामपंचायती आहेत. कचऱ्यामुळे परिसराच्या विद्रुपीकरणात भर पडते. तसेच पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने प्लास्टिक कचरा धोकादायक असतो. कचऱ्याचे संकलन होणे गरजेचे आहे. लोकसंख्या जास्त त्याठिकाणी कचऱ्याचे प्रमाणही जास्त असते. याचीच दखल प्रशासनाने घेत संगमेश्वर तालुक्यातील कसबा, साडवली, कडवई, कोंडगाव, तुरळ, दाभोळे या ग्रामपंचायतींना सीएनजी गाड्या प्रदान केल्या आहेत.
रत्नागिरी येथे नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.








