एखादा आजार किंवा विकार झाला, तर जीव मेटाकुटीला येतो, हा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांनी घेतला आहे. तथापि, अमेरिकेतील अलेक्झांड्रा पॅन विल्सेडन नामक महिला सध्या एकाचवेळी सहा जीवघेण्या आजारांशी दोन हात करीत आहे. ही महिला एक प्रसिद्ध पॉडकास्ट होस्ट आणि कंटेंट क्रिएटर होती. पण आता ती अंथरुणाला खिळली आहे. अंगभर असह्या वेदना तिला होतात. एकाच वेळी सहा असाध्य दुखण्यांनी ती त्रस्त आहे. अशी स्थिती कोटींमधून एखाद्याची असते, असे डॉक्टरांचे मत आहे. ही महिला सध्या केवळ आपल्या पतीच्या साहाय्यामुळे आणि स्वत:च्या इच्छाशक्तीवर आयुष्य कंठत आहे.
तिला पॉलिआर्थरायसि नोडोसा (पीएएन) नामक असाध्य विकार झाला आहे. या विकारामुळे माणसाच्या रक्तवाहिन्यांना सूज येते आणि त्यामुळे शरीराच्या सर्व भागांना योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही. त्यामुळे अनेक अवयवांमधून जीवघेण्या कळा येतात. अशक्तपणा येतो. रक्तपुरवठा योग्य प्रकारे न झाल्याने स्नायू दुर्बळ होतात. परिणामी हालचाल करणेही अशक्य बनते. तिला ‘काँप्लेक्स रीजनर पेन सिंड्रोम (सीआरपीएस) हा आणखी एक असाध्य विकार जडला आहे. रक्तवाहिन्या दुर्बळ झाल्याने हा दुसरा विकार पहिल्या विकारातून उद्भवला आहे. असह्या वेदनांनी तिला रात्रीच्या रात्री विव्हळत काढाव्या लागतात. दिवसाकाठी अशीबशी दोन ते तीन तास झोप लागते. सकाळी उठल्यानंतर तिला अक्षरश: रडू कोसळते, अशी माहिती तिने स्वत:च दिली आहे. अचानक तिला ताप चढतो. आपल्या शरीराला आग लागली आहे, असा तिला भास होतो. हातापायांवर मुंग्या चढल्या आहेत, असे वाटते. तरीही ती निर्धाराने तग धरुन असल्याचे दिसते. या सर्व घटनाक्रमामध्ये कौतुक होत आहे, ते तिच्या पतीचे. सध्या ही महिला केवळ पतीच्या आधारावर जगत आहे. तिला अंथरुणात उठून बसण्यासही पतीचे साहाय्य घ्यावे लागते. विशेष बाब अशी की तिच्या सहा विकारांपैकी एकावरही निश्चित असे औषध नाही. असह्या होत असलेल्या वेदना थांबविण्यासाठी वेदनाशामक औषधेही नेहमी घेता येत नाहीत. कारण, त्यांचे दुष्परिणाम वेगळेच असतात. त्यामुळे केवळ सहन करणे, हा एकच उपाय आहे. तिच्या पतीने मात्र अशा स्थितीतही धीर सोडलेला नाही, हाच काय तो तिला मोठा आधार आहे.









