11 जणांना वाचविण्यात यश
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमधील उमानाथ घाटावर रविवारी भाविकांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत उलटली. या दुर्घटनेत 6 जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. बुडालेल्या बोटीमधून एकूण 17 जण प्रवास करत होते. त्यापैकी 11 जणांना वाचवण्यात आल्याची माहिती एसडीआरएफच्या पथकाने दिली.
पाटणाजवळ गंगा नदीपात्रात स्नान करण्यासाठी रविवारी भाविकांनी गर्दी केली होती. याचदरम्यान, एक बोट भाविकांच्या अतिभारामुळे गंगेच्या मध्यभागी बुडाली. उमानाथ घाटाजवळ झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता लोकांचा शोध सुरू करण्यात आला आहे. पाणबुड्यांच्या मदतीने बेपत्ता असलेल्यांचा नदीत शोध सुरू करण्यात आला होता. स्थानिक लोकही बचावकार्यात मदत करत होते. या घटनेबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.









