मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सोडले, कटुता संपवून सगळ्या समाजांसाठी काम करण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ मुंबई
मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेले उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. मराठा बांधवांना गावाकडे जाताना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मी आता रुग्णालयात जाणार आहे. शिस्त बाळगून गावाकडे जा, अशा सूचना केल्या. पाच दिवसांच्या या उपोषणानंतर जरांगे पाटलांच्या बऱ्याच मागण्या मान्य झाल्या आहेत. उपोषण सोडल्यानंतर गणपतीची आरतीही करण्यात आली. मराठा आरक्षण उपसमितीनेही मराठा समाजाचे आभार मानले.
सरकारच्या जीआरमध्ये काय आहे?
सरकारने जारी केलेला हा जीआर हैदराबाद गॅझेटसंदर्भात आहे. जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता 2001 च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. 23 व त्याअंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी केली जाईल. त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यास साहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गावपातळीवर एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत 1. ग्राम महसूल अधिकारी, 2. ग्रामपंचायत अधिकारी, 3. साहाय्यक कृषी अधिकारी असतील, असे या गॅझेटमध्ये नमूद आहे.
स्थानिक चौकशी करून खातरजमा केली जाईल
मराठा समाजातील भू-धारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी 13-10-1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा केली जाईल, असेही शासन निर्णयात नमूद आहे.
मराठा कुणबी आहे असा जीआर काढा
मराठा कुणबी आहे असा जीआर काढा, मराठा कुणबी एकच हा जीआर जारी करा, अशी मागणी देखील जरांगे यांनी केली. यावर समितीने ते किचकट आहे त्याला वेळ लागेल. 1 महिना लागेल. पण, मी म्हणतो त्याला 2 महिने घ्या. पण, जी आर काढा असे जरांगे पाटील म्हणाले. आता, हैदराबाद आणि सातारा या 2 गॅजेटच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शासनाने आपल्या मागण्या मान्य केल्याची घोषणा केली.
हे निर्णय झाले आहेत…
- हैद्राबाद संस्थानच्या गॅझेटिअरची अंमलबाजवणी करणार
- सातारा संस्थान गॅझेटिअरची अंमलबजावणीसाठी एक महिना मुदत
- आंदोलकांवरील खटले मागे घेणार
- बलिदान झालेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देणार, वारसाला नोकरी देणार
- दोन्ही गॅझेटिअरचे दोन, उर्वरित मागण्यांचा एक, असे तीन जीआर निघणार
- 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीत राहणार.









