नवारस्ता :
कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाल्याने धरणात प्रतिसेकंद तब्बल 25 हजार 478 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाल्याने मंगळवारी सकाळी 11 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 3 हजार 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातील 2100 आणि सहा वक्र दरवाजामधून 3 हजार 400 असे मिळून एकूण 5 हजार 500 क्युसेकचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.
सध्या कोयना धरणात 75.48 टीएमसी पाणीसाठा झाला असून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी आज सकाळी 11 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून कोयना नदीपात्रात 5 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
दरम्यान या विसर्गामुळे आणि पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या पावसामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून कोयना आणि कृष्णाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कोयना जलसिंचन विभागाच्या वतीने केले आहे.
दरम्यान मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत कोयनानगर येथे 20 (2350) मिमी, नवजा येथे 33 (2235) मिमी आणि महाबळेश्वर येथे 100 (2318) मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून धरणाच्या पाणीपातळी 2137 फूट 3 इंच आणि 651.434 मीटर इतकी झाली आहे.
- महाबळेश्वर, कोयना, नवजानेही 2 हजाराचा टप्पा ओलांडला
पाणलोट क्षेत्रात जून महिन्यापासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे जुलै महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात धरणाच्या पाणीसाठ्याची पंचाहत्तरी ओलांडली तर कोयना, महाबळेश्वर आणि नवजा या तिन्हीही पर्जन्यमापन केंद्रावर पावसाने दोन हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे








