वृत्तसंस्था/ राईन-रुहर, जर्मनी
जर्मनीतील जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये भारतीय बॅडमिंटन संघाने कांस्यपदक जिंकले पण प्रशासकीय चुकीमुळे सहा खेळाडूंना वगळण्यात आल्यामुळे उपस्थित खेळांडूना वादाला सामोरे जावे लागले.
जर्मनीतील राईन-रुहर येथे झालेल्या जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये मिश्र संघाचे कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघाच्या निवडीवरून वाद निर्माण झाला आहे. प्रशासकीय चुकांमुळे निवडलेल्या 12 खेळाडूंपैकी सहा खेळाडूंना सहभागी होण्यापासून रोखण्यात आले. भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बारा खेळाडूंची निवड करण्यात आली होती, परंतु 16 जुलै रोजी व्यवस्थापकांच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी सर्व नावे योग्यरित्या सादर न केल्यामुळे केवळ सहा जणांना स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे या खेळांडूच्या करीयरबाबत चिंता निर्माण झाली आहे.
या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या अलिशा खानने इंस्टाग्रामवर लिहिलंय की, आम्ही एकही सामना गमावला नाही. आम्ही सहभागी होण्याचा अधिकारच गमावलाय. आम्हाला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बी.व्ही. राव आणि अजित मोहन हे बैठकीला उपस्थित असलेले असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे (एआययू) अधिकारी होते. देशातील विद्यापीठस्तरीय खेळांसाठी नोडल संस्था असलेल्या एआययूने या घटनेची कबुली दिली. आम्हाला याबद्दल माहिती देण्यात आली आहे आणि या प्रकरणाची चौकशी केली जात आहे, असे एआययूचे सचिव डॉ. पंकज मित्तल यांनी वृत्तसंस्थेला माहिती दिली.









