हत्येचा कट तिहार कारागृहात रचल्याचेही स्पष्ट
चंदिगढ, डेहराडून / वृत्तसंस्था
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येप्रकरणी तपास पथकाने उत्तराखंडपर्यंत धडक देत सहा संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. येथे एसटीएफसह पंजाब पोलिसांनी उत्तराखंडच्या 6 जणांना ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी लॉरेन्स टोळीचा संशयित शार्पशूटर असल्याचे सांगण्यात येत आहे. हिमाचलमधून उत्तराखंडमध्ये प्रवेश करत असताना कार थांबवून त्याला ताब्यात घेण्यात आले. पंजाब पोलीस त्यांची ओळख पटवत असून अधिक चौकशी केली जात आहे.
मुसेवाला याच्या हत्येप्रकरणी आयजींच्या नेतृत्वाखाली एसआयटीद्वारे तपास सुरू आहे. आयजी आणि एसपी तपासासाठी मानसा येथे तळ ठोकून आहेत. घटनास्थळावरून तीन एके-94 रायफलच्या गोळय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. मुसेवाला याच्यावर आठ हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा पोलिसांचा दावा आहे. टोळीचा म्होरक्मया लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी कॅनडाचा गँगस्टर गोल्डी ब्रार याने सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. हत्या झाल्यानंतर तत्काळ तपासाला सुरुवात करण्यात आली असून अवघ्या चोवीस तासांच्या आत हल्लेखोरांना पकडण्यात यश प्राप्त झाले आहे.
गँगस्टर गोल्डी ब्रारने स्वीकारली जबाबदारी
गँगस्टर गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. गोल्डी ब्रारने हत्येनंतर तीन तासांनी फेसबुक पोस्टद्वारे घटनेची जबाबदारी घेतली. माझ्या एका सहकाऱयाच्या हत्येप्रकरणी मुसेवालाचे नाव पुढे आले होते, पण सरकारच्या बचावामुळे त्याला शिक्षा होऊ शकली नाही. त्यामुळेच आपण सिद्धू मुसेवालाची हत्या केल्याचे ब्रार याने लिहिले आहे. गोल्डी ब्रार सध्या कॅनडामध्ये आहे.
तिहार कारागृह ते कॅनडा कनेक्शन
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा कट तिहार तुरुंगात रचला गेला. तिहारमध्येच कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई कैद असून त्याने सध्या कॅनडात असलेल्या गोल्डी ब्रार याच्यासोबत बोलणी केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच यात पंजाबी गायक मनकिरत औलखचा मॅनेजरही सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. यामागे तिहार तुरुंगातून सुरू असलेला मोबाईल क्रमांकही तपास यंत्रणांना सापडला आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा पंजाब विद्यापीठ चंदीगडच्या विद्यार्थी राजकारणातून पुढे आला आहे. त्याचे पंजाबमध्ये दविंदर बंबिहा ग्रुपसोबत टोळीयुद्ध सुरू आहे. 2016 मध्ये झालेल्या चकमकीत दविंदर बंबिहा मारला गेला होता. असे असतानाही त्यांचा गट कार्यरत आहे. बंबिहा ग्रुप आर्मेनियामध्ये तळ ठोकून असलेला लकी पटियाल चालवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. बिश्नोई टोळीसाठी काम करत असल्यामुळे बिश्नोईचा मित्र विक्री लॉरेन्सची हत्या करण्यात आली होती.
मुसेवालाचे पोस्टमार्टम
मानसा येथे सिद्धू मुसेवाला यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. यासंबंधीच्या तपासासाठे फॉरेन्सिक तज्ञांसह 5 डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील न्यायिक आयोगाकडून चौकशीचे पत्र लिहिल्यानंतर कुटुंबियांनी शवविच्छेदनासाठी होकार दिल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आता हत्येचे प्रकरण न्यायालयात पोहोचले असून उच्च न्यायालयाने पंजाब सरकारकडून उत्तर मागवले आहे. व्हीआयपी सुरक्षेतील कपातीची माहिती लीक कशी झाली, असा सवाल न्यायालयाने केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 जून रोजी होणार आहे.









