प्रतिनिधी / दापोली
दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पेण-पनवेल-मुंबई गोवा मार्गावर प्रवाशांच्या गाडीवर दगडफेक करून लाखो रुपये किंमतीचे दागिने लुटल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या प्रकरणी दादर सागरी पोलिसांनी त्वरित तपास लावत 15 आरोपीमधील नवी मुंबई परिसरातील 6 आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.
दिलीप देवरे (24, रा. कुडावे, पनवेल), सुरेंद्र भगवान रामा बिष्णोई (20, रा. डेरवली-पनवेल), पुनम किसानराम बिष्णोई (22, मूळ रा. राजस्थान, सध्या रा. डेरवली, पनवेल), प्रभाकर हरी उलवेकर (43, रा. खिडूकपाडा-नावडे, पनवेल़), श्रीचंद्र कृष्णरामा बिष्णोई (डेरवली, पनवेल), श्यामसुंदर भागीरथराम बिष्णोई (डेरवली, पनवेल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सोमवारी पहाटे प्रवाशांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीमधील मुलगा, भाऊ, बहीण, वडील यांना दांडक्याने मारहाण करून त्यांच्याकडे असलेले लाखो रुपये किंमतीचे दागिने लुटले. यामुळे खळबळ उडून प्रवाशांमध्ये भीतीदायक वातावरण पसरले आहे. या प्रकरणी दादर सागरी पोलिसांनी त्वरित तपास लावत अटक केलेल्या 6 आरोपींना मंगळवारी पेण येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. या प्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे हे रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास करत आहेत.









