इंटरनेट-मोबाइल सेवा बंद :मेघालयात कुकी-मैतेई समुदायाचे विद्यार्थी परस्परांना भिडले
वृत्तसंस्था / इंफाळ
मणिपूरमध्ये मैतेई आरक्षण वादावरून भडकलेल्या हिंसेनंतर शुक्रवारी स्थिती नियंत्रणात आली आहे. राज्याच्या 16 पैकी 8 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी कायम आहे. सैन्य अन् आसाम रायफल्सच्या तुकड्यांना तैनात करण्यात आले आहे. हिंसेत आतापर्यंत काही जण मारले गेल्याचे सांगण्यात येत असले तरीही याची पुष्टी होऊ शकलेली नाही. तर 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मोबाइल इंटरनेट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. अपरिहार्य स्थितीत दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश सुरक्षा दलांना देण्यात आला आहे. तसेच मणिपूरमध्ये जाणाऱ्या रेल्वेंना रोखण्यात आले आहे. तर राज्यात आतापर्यंत 10 हजार लोकांना मदतशिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे. तर मणिपूरमधील हिंसा पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकातील प्रचारदौरा रद्द केला आहे. मणिपूरमधील स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी त्यांनी राज्य तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा चालविली आहे.

मेघालयची राजधानी शिलाँगमध्ये देखील कुकी आणि मैतेई समुदायाच्या महाविद्यालयीय विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली आहे. दोन्ही समुदायांच्या विद्यार्थ्यांनी परस्परांना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी 16 जणांना अटक केली आहे.
निदर्शनांदरम्यान झटापट, हिंसेत रुपांतर
मणिपूरमध्ये ऑल इंडिया ट्रायबल स्टुडंट युनियनने बुधवारी ट्रायबल सॉलिडेरटी मार्च पुकारला होता. यादरम्यान आदिवासी आणि बिगर आदिवासी समुदायांमध्ये संघर्ष झाला होता. बिगरआदिवासी समुदाय मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीवरून हा संघर्ष सुरू झाला. मैतेई समुदायाच्या मागणीचा विचार करत 4 महिन्यांच्या आत केंद्राला शिफारस करण्याचा निर्देश मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. याच निर्देशानंतर आदिवासी आणि बिगर आदिवासी समुदायांमध्ये हिंसा सुरू झाली.
10 हजार लोक बेघर
हिंसेमुळे चूराचांदपूर जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे. समाजकंटकांनी राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये शेकडो दुकाने अन् घरांसमवेत 24 प्रार्थनास्थळांना पेटवून दिले आहे. चूराचांदपूर जिल्ह्dयात 10 हजार लोक बेघर झाले आहेत. सैन्याने गुरुवारी रात्रभर मोहीम राबवून लोकांना सुरक्षित शिबिरांमध्ये हलविले आहे. 5 हजार बेघरांना चूराचांदपूर तर 2 हजार बेघरांना इंफाळ खोरे आणि इतरांना टेंग्नोउपालच्या शिबिरांमध्ये पाठविण्यात आले आहे. सैन्याची हेलिकॉप्टर्स स्थितीवर हवाई नजर ठेवून आहेत.
आरक्षणाच्या मागणीवरून वाद
मणिपूरच्या सुमारे 38 लाख लोकसंख्येत निम्म्याहून अधिक हिस्सेदारी मैतेई समुदायाची आहे. मणिपूरच्या सुमारे 10 टक्के क्षेत्रफळात फैलावलेले इंफाळ खोरे मैतेई समुदायबहुल आहे. राज्याच्या उच्च न्यायालयाने अलिकडेच मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यासंबंधी सरकारला आदेश दिला आहे. 1949 मध्ये भारतात विलीन होण्यापूर्वी आदिवासीचा दर्जा प्राप्त हेता असे मैतेई समुदायाचे म्हणणे आहे. मागील 70 वर्षांमध्ये राज्यातील मैतेई समुदायाची हिस्सेदारी 62 टक्क्यांवरून कमी होत 53 टक्क्यांवर आली आहे. अशा स्थितीत स्वत:ची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी मैतेई समुदाय आरक्षणाची मागणी करत आहे.
कुकी समुदायाचा विरोध
मणिपूरमधील नागा अन् कुकी समुदायाकडून मैतेई समुदायाला आरक्षण देण्यास विरोध दर्शविला जात आहे. राज्याच्या 90 टक्के क्षेत्रात राहणाऱ्या नागा आणि कुकी समुदायाची लोकसंख्येतील हिस्सेदारी 34 टक्के आहे. राज्यातील 60 पैकी 40 मतदारसंघ मैतेईबहुल इंफाळ खोऱ्यात आहेत. राजकीय स्वरुपात मैतेई समुदायाचा मणिपूरमध्ये दबदबा असल्याचे या दोन्ही समुदायांचे म्हणणे आहे.









