राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर शनिवारी रात्री दोन्ही देशांमध्ये तणाव दिसून आला तरी रविवारी सकाळपासून सीमेला लागून असलेल्या राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती सामान्य दिसून आली. बाजारपेठांमधील व्यवहार सामान्य होत असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. श्रीनगरमध्येही परिस्थिती सामान्य झाली आहे. बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. याचददरम्यान, भारतीय हवाई दलाने आम्ही ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट साध्य केले आहे. हे ऑपरेशन अजूनही चालू आहे. वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला माहिती देऊ असे सांगतानाच अफवा टाळण्याचे आवाहन हवाई दलाने केले आहे.
शनिवारी मध्यरात्री नियंत्रण रेषेवर गोळीबार झाला नाही, यानंतर रात्री उशिरा श्रीनगरमधील ब्लॅकआउट उठवण्यात आला. रात्री 9:30 नंतर श्रीनगरमध्ये कोणत्याही प्रकारची ड्रोनची हालचाल दिसून आली नाही. तरीही लष्कर आणि सुरक्षा दल हाय अलर्टवर आहेत. अमृतसरमध्ये परिस्थिती सामान्य आहे. लोक त्यांचे दैनंदिन काम करत आहेत. रविवारी कार्यालये उघडी नसतात, परंतु बाजारपेठा सुरु झाल्या आहेत.
पहलगाम हल्ल्याच्या दिवशी, 22 एप्रिलपासून ते 10 मे पर्यंत पाकिस्तानी गोळीबारात 6 सैनिक हुतात्मा झाले आहेत, तर 60 जण जखमी झाले आहेत. याशिवाय 25 नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानी भूमीवरील दहशतवाद्यांचे अ•s उद्ध्वस्त केले. जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर येथील अ•dयाला लक्ष्य करून भारताने ‘दहशतवादाचा कारखाना यापुढे चालणार नाही’ असा स्पष्ट संदेश दिला आहे. पाकिस्तानसोबतच्या संघर्षात भारतीय सैन्याने सर्वात घातक शस्त्रs वापरल्यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले.
पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन करून ड्रोन हल्ले सुरूच ठेवल्याचे प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्याकडून एकमेकांवर शाब्दिक आरोपही झाले. भारतीय विदेश मंत्रालयाने शनिवारी रात्री 11 वाजता पत्रकार परिषद घेत सर्वप्रथम पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा दावा केला. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास प्रसारमाध्यमांसमोर भारताविरोधात आगपाखड करत क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला. याचदरम्यान भारतानेही शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास कडक प्रत्युत्तर देण्याचे आदेश लष्करप्रमुखांनी कमांडर्सना दिल्यामुळे आता सीमेवरील परिस्थिती पूर्वपदावर आल्याचे दिसत आहे.
लष्करप्रमुखांकडून कमांडर्सना आदेश
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सीमेवरील परिस्थितीचा रविवारी सकाळी आढावा घेतला. 10 मे च्या रात्री झालेल्या युद्धबंदी उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम सीमेवरील कमांडर्ससोबत सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. यावेळी शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास प्रतिक्रियेचे पूर्ण अधिकार जनरल द्विवेदी यांनी कमांडर्सना दिले आहेत.
घरी परतण्याची घाई करू नका : जम्मू-काश्मीर पोलीस
जम्मू काश्मीर पोलिसांनी सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरी परतण्याची घाई करू नका असे आवाहन केले आहे. सध्या असलेल्या ठिकाणी तुम्ही सुरक्षित असल्यामुळे परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर येईपर्यंत आहात तिथेच थांबा, असे जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्याच्या धोक्यामुळे नियंत्रण रेषेजवळील बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा येथील 1.25 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले आहे. जोपर्यंत सीमावर्ती भागातील तणाव पूर्णपणे स्थिरस्थावर होत नाही तोपर्यंत लोकांनी त्यांच्या घरी परतू नये, असे जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले.









