खासदारांना निवेदन सादर, तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी
बेळगाव : उद्योगांचे खासगीकरण बंद करा, केंद्र सरकारच्या योजनांच्या अनुदानात वाढ करा, अन्न, आरोग्य, शिक्षण, समानवेतन निश्चित करा, कामगारांना सेवा, सुविधा द्या, आदी मागण्यांसाठी ‘सिटू’च्या नेतृत्वाखाली शुक्रवारी आंदोलन छेडण्यात आले. शिवाय मागण्यांबाबतचे निवेदन खासदार मंगला अंगडी यांना सादर करण्यात आले. विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात 23 ते 25 जानेवारी दरम्यान 28 खासदारांच्या कार्यालयांवर धडक देऊन आंदोलन छेडले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून बेळगाव येथील खासदारांना निवेदन देण्यात आले आहे. सरकारने खासगीकरणाचा सपाटा सुरू ठेवला आहे. त्यामुळे कर्मचारी आणि अनेक कुटुंबे अडचणीत आली आहेत. त्यामुळे खासगीकरण तातडीने थांबवावे, माध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. त्यांच्या वेतनात वाढ करावी, त्याचबरोबर अनेक वर्षांपासून आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणीही सिटूच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
तीन दिवस राज्यव्यापी आंदोलन
विविध मागण्यांसाठी तीन दिवस राज्यव्यापी आंदोलन हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत खासदारांच्या कार्यालयांवर आंदोलन छेडून निवेदन दिले जाणार आहे. बेळगाव, कित्तूर, रायबाग, हुक्केरी, कागवाड आदी तालुक्यांमध्येही आंदोलन छेडून निवेदन दिले जाणार आहे. याप्रसंगी आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, माध्यान्ह आहार कर्मचारी, ग्राम पंचायत कर्मचारी यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.









