वृत्तसंस्था/ पाल्मा
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या मॅलोर्का पुरूषांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाचा टॉप सीडेड डॅनिल मेदवेदेव्हचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. ग्रीसच्या सित्सिपसने एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
गुरूवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनच्या रॉबर्टो ऍग्युटने मेदवेदेव्हचा 6-3, 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. गेल्या आठवडय़ात हॅले येथे झालेल्या स्पर्धेत मेदवेदेव्हने ऍग्युटचा पराभव केला होता. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात ग्रीसच्या सित्सिपसने अमेरिकेच्या गिरॉनचा 7-6 (7-5), 4-6, 6-3 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. येत्या सोमवारपासून सुरू होणाऱया विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सित्सिपसचा सलामीचा सामना फ्रान्सच्या बेंजामिन बोंझाशी होणार आहे.









