जीर्ण इमारतीमुळे नव्या जागेचा शोध : कार्यालय अन्य ठिकाणी हलवण्यासाठी हालचाली गतिमान
बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयाची इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर छतातून पावसाचे पाणी थेट कागदपत्रांवर गळत असल्याचे चित्र दिसून आले होते. यामुळे तहसीलदार कार्यालय अन्य ठिकाणी हलवण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. शहरातील काही सरकारी कार्यालयांच्या इमारतींची चाचपणी सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. स्वामी विवेकानंद मार्ग येथे बेळगाव तहसीलदार कार्यालय आहे. सध्या असलेले तहसीलदार कार्यालय हे जुन्या महानगरपालिकेच्या इमारतीत सुरू आहे. कार्यालयात अत्यंत कमी जागा उपलब्ध असल्यामुळे तहसीलदार कार्यालयातील भूमी विभाग कचेरी रोड येथील जुन्या तहसीलदार कार्यालयात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अर्धे कार्यालय एका ठिकाणी तर उर्वरित कार्यालय एका ठिकाणी अशी काहीशी परिस्थिती तहसीलदार कार्यालयाची झाली आहे.
इमारतीत अनेक ठिकाणी गळती
सध्याच्या इमारतीमध्ये अनेक ठिकाणी गळती लागली आहे. इमारत जीर्ण झाल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. शहरासह तालुक्यातील शेकडो नागरिकांची कार्यालयात ये-जा असते. रेशनकार्ड, विविध पेन्शन, नुकसानभरपाई यासह महसुलासंदर्भातील सर्व कागदपत्रांसाठी याच ठिकाणी यावे लागते. परंतु जागा अपुरी असल्यामुळे कागदपत्रे ठेवणेही अवघड झाले आहे. यामुळे तहसीलदार कार्यालयाला नवीन इमारत देण्याची मागणी केली जात आहे.
शहरापासून दूर तहसीलदार कार्यालय नको
तहसीलदार कार्यालयासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील काही कार्यालयांची पाहणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिवाजीनगर भागातील काही जुन्या कार्यालयांची चाचपणी करण्यात आली आहे. शहरापासून दूर तहसीलदार कार्यालय नको, अशी सूचना लोकप्रतिनिधींनी केल्यामुळे शहरातच कार्यालयासाठी जागेची पाहणी करण्या येत आहे. त्यामुळे नवीन कोणत्या जागेत तहसीलदार कार्यालय सुरू होणार, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.









