महापालिका आयुक्त-आरोग्याधिकाऱ्यांकडून भेंडीगेरीला भेट
बेळगाव : भेंडीगेरी येथे महापालिकेच्या मालकीची दोन एकर जागा असून त्याठिकाणी वैद्यकीय कचरा प्रकल्प उभारावा की, कुत्र्यांचे निर्बिजीकरण केंद्र (एबीसी) उभारावे, यासाठी मनपा आयुक्त शुभा बी., आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे व सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. वैद्यकीय कचरा प्रकल्प उभारण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी 2013 मध्ये भेंडीगेरी येथे महापालिकेसाठी दोन एकर जागा मंजूर केली आहे. मात्र त्याठिकाणी अद्याप कोणत्याही प्रकारचा प्रकल्प उभारण्यात न आल्याने सदर जागा तशीच पडून आहे. त्या ठिकाणच्या जागेवर कोणी अतिक्रमण केले आहे का, याची शहानिशा करण्यासाठी नुकतीच मनपा आयुक्त व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी भेंडीगेरीला भेट दिली.
सदर ठिकाणी वैद्यकीय कचरा प्रकल्प उभारण्यासाठी विचार सुरू असला तरी त्याला वरिष्ठ पातळीवर मंजुरी मिळणे गरजेचे आहे. सध्या भटक्या कुत्र्यांवर श्रीनगर येथील गोशाळेत निर्बिजीकरण केले जात आहे. त्याठिकाणची जागा अत्यंत तोकडी असल्याने गेल्या काही वर्षांपासून नवीन जागेची पाहणी केली जात आहे. अलीकडेच के. के. कोप्प येथे एबीसी सेंटरसाठी जागेची पाहणी केल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी आरोग्य स्थायी समिती बैठकीत दिली होती. आरोग्याधिकाऱ्यांना जागा निश्चित करण्यासंदर्भात वारंवार सूचनाही केली जात आहे. भेंडीगेरी येथे एबीसी सेंटर सुरू करण्यावरही गांभीर्याने विचार सुरू आहे. याबाबत मनपा आयुक्त शुभा बी. यांनी जागेची पाहणी करून माहिती जाणून घेतली.









