विविध राख्यांची खरेदी : बुधवारी रक्षाबंधन
बेळगाव : बहीण-भावाचे नाते दृढ करणारा रक्षाबंधन सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात राखी खरेदी वाढली आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने महिलावर्गाने राखी खरेदीला पसंती दिली. त्यामुळे बाजारात राखी खरेदीची रेलचेल पाहावयास मिळाली. पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, कडोलकर गल्ली आदी ठिकाणी वर्दळ वाढलेली पाहायला मिळाली. अलीकडे नवनवीन राख्यांची क्रेझ वाढली आहे. सोने-चांदीबरोबर लहान मुलांसाठी आकर्षण ठरणाऱ्या लाईट पेटणाऱ्या राख्यांचीही खरेदी वाढली आहे. विशेषत: मेणसी गल्ली आणि पांगुळ गल्लीमध्ये तरुणींनी खरेदीसाठी गर्दी केली होती. बुधवारी रक्षाबंधन असल्याने भावाला राखी बांधण्यासाठी बहिणींनी बाजारात गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. गोंडा, धागा यासह इतर राख्यांनाही अधिक पसंती होती. विशेषत: रविवारी सुटी असल्याने शाळा-महाविद्यालयीन तरुणी राखी खरेदीसाठी बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे बाजारात वर्दळ पाहावयास मिळाली.









