सीबीआयकडून सुधारित नोटीस जारी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बहुचर्चित मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. आता येत्या रविवारी म्हणजेच 26 फेबुवारी रोजी त्यांना सीबीआय मुख्यालयात हजर राहण्यासाठी नोटीस काढण्यात आली आहे. यापूर्वीच्या नोटिसीनुसार त्यांना 19 जानेवारी रोजी पाचारण करण्यात आले होते. मात्र, दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्प पूर्वतयारीचे कारण पुढे करत त्यांनी वेळ वाढवून देण्याची मागणी सिसोदिया यांनी केली होती. त्यानंतर सिसोदिया यांना पुढील चौकशीसाठी लवकरच दुसरे समन्स जारी केले जाईल, असे सीबीआयने स्पष्ट केले होते. नव्याने प्राप्त झालेल्या नोटिसीनुसार आपण येत्या रविवारी चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर होणार असल्याचे सिसोदिया यांनी सांगितले.
दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांना आरोपपत्रात आरोपी करण्यात आलेले नसले तरी ते संशयाच्या भोवऱयात असून त्यांची यापूर्वी अनेकवेळा चौकशी झालेली आहे. सध्या ते तपास यंत्रणांच्या रडारवर असून ठोस धागेदोरे सापडल्यास त्यांच्या अटकेची कारवाई होऊ शकते. आपल्यावरील कारवाईसंबंधी सिसोदिया यांनी यापूर्वी कठोर भाष्यही केले आहे. ‘सीबीआय आणि ईडीने माझ्याविरोधात पूर्ण ताकद लावली आहे. यापूर्वी घरावर छापे टाकले आहेत, बँक लॉकरची झडती घेतली आहे, पण माझ्याविरोधात आतापर्यंत काहीही सापडले नाही. छापे पडल्यानंतरही तपासात मी नेहमीच सहकार्य केले असून यापुढेही तपास यंत्रणांना योग्य उत्तरे देईन, असे सिसोदिया यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मद्य घोटाळय़ासारखे काहीही झाले नाही. हा विरोधी पक्षाने निर्माण केलेला राजकीय मुद्दा आहे. आतापर्यंत सीबीआय आणि ईडीला तपासात काहीही सापडलेले नाही, असे म्हटले आहे.









