दुखापतग्रस्त बुमराहऐवजी पर्यायाची चाचपणी, अंतिम निवडीसाठी मुदत शनिवारपर्यंत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जलद गोलंदाज मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी व शार्दुल ठाकुर लवकरच आयसीसी टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन दौऱयावर असलेल्या भारतीय पथकात दाखल होणार आहेत. दीपक चहर मात्र पाठीच्या दुखापतीमुळे आगामी टी-20 वर्ल्डकपमधून यापूर्वीच बाहेर फेकला गेला आहे. यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा रविवार दि. 16 ऑक्टोबरपासून खेळवली जाणार आहे.
यापूर्वी दीपक चहरचा वर्ल्डकपसाठी राखीव खेळाडूत समावेश होता आणि जसप्रित बुमराह वर्ल्डकप खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर त्याचा वर्ल्डकप अंतिम संघातील सहभाग देखील निश्चित मानला जात होता. मात्र, पाठदुखीतून सावरण्यासाठी त्याला अद्याप बराच वेळ लागेल, असे चित्र आहे.
‘दीपक चहर पाठीच्या दुखापतीतून सावरण्यासाठी बराच अवधी घेईल, असा अंदाज आहे. त्याची दुखापत काहीशी चिघळली आहे. त्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआय मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकुर, असे तीन पर्यायी खेळाडू रवाना करत आहे’, असे मंडळाच्या एका पदाधिकाऱयाने गोपनियतेच्या अटीवर सांगितले.
चहरने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत पूर्ण सहभाग घेतला. मात्र, त्याचवेळी त्याला पाठीची दुखापत झाली आणि वनडे मालिकेतून माघार घ्यावी लागली. नंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅबिलेशनसाठी दाखल झाला.
तूर्तास, जसप्रित बुमराहऐवजी पर्यायी खेळाडूची घोषणा करण्यासाठी दि. 15 ऑक्टोबरपर्यंत वेळ असल्याचे संकेत आहेत. सिराज, शमी व शार्दुल यातील एक खेळाडू बुमराहची जागा घेईल. तोवर, या तिन्ही खेळाडूंचा फॉर्म व फिटनेसची चाचणी घेतली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियात वेळीच दाखल झाल्याने या खेळाडूंना स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ देखील लाभणार आहे. यामुळे, यातील कोणत्याही खेळाडूला संधी मिळाल्यास थेट मैदानात उतरता येईल. शमी गोलंदाजीतील कलात्मकता आणि अनुभवामुळे आघाडीवर आहे. पण, अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संपन्न झालेल्या वनडे मालिकेत सिराजने 5 बळींसह मालिकावीर पुरस्कार संपादन केला आणि चुणूक दाखवून दिली. याशिवाय, शार्दुल ठाकुरची अष्टपैलू खेळाची धमक बलस्थान असणार आहे. हार्दिक पंडय़ाच्या साथीने तो उत्तम योगदान देऊ शकतो. पण, तूर्तास त्याला राखीव खेळाडूंमध्येच रहावे लागेल, असे संकेत आहेत.
रवि बिश्नोई व श्रेयस अय्यर यांना ऑस्ट्रेलियाला जावे लागण्याची सध्या शक्यता नाही. संघाने अतिरिक्त फलंदाजाची मागणी केली तरच त्यांना ऑस्ट्रेलियाला रवाना केले जाणार आहे. बिश्नोईच्या बाबतीत यजुवेंद्र चहलला दुखापत झाली तरच संधी प्राप्त होऊ शकते.









