वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीतर्फे प्रत्येक महिन्याच्या अखेरीस क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेत पुरूष आणि महिलांच्या विभागात सर्वोत्तम क्रिकेटपटूंचा पुरस्कार दिला जातो. आता ऑगस्ट महिन्यातील पुरूष विभागाच्या सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठी भारताचा वेगवान गोलंदाज तसेच इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजची शिफारस करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यातील आयसीसीच्या या पुरस्कारासाठी मोहम्मद सिराज, न्यूझीलंडचा मॅट हेन्री आणि विंडीजचा जायडेन सिलेस यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत मोहम्मद सिराजने 23 गडी बाद केले. सिराजच्या दर्जेदार कामगिरीमुळे भारताला ही मालिका अखेर बरोबरीत राखता आली. सिराजने या मालिकेत पाच कसोटीत 185.3 षटकांची गोलंदाजी केली. जसप्रित बुमराहच्या गैरहजेरीत सिराजने दर्जेदार कामगिरी करुन भारताला या मालिकेतील शेवटची कसोटी जिंकून दिली. न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीशी या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. झिम्बाब्वेमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडच्या विजयात हेन्रीचा वाटा मोलाचा ठरला आहे. त्याने या मालिकेत एकूण 16 गडी बाद केले आहेत. न्यूझीलंडने ही मालिका 2-0 अशी जिंकली आहे.
विंडीजचा वेगवान गोलंदाज जायडेन्स सिलेस याची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. विंडीजने तब्बल 34 वर्षानंतर पाक विरुद्ध पहिली वनडे मालिका जिंकली आहे. या मालिकेत सिलेसने 3 सामन्यांत 10 गडी बाद केले. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात सिलेसने 18 धावांत 6 बळी मिळविल्याने पाकला विंडीजने केवळ 92 धावांत गुंडाळले होते.









