दुबई
इंग्लंडविऊद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात विजयी कामगिरी केल्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम 15 वे स्थान मिळवले आहे. सामन्यात नऊ विकेट्स घेतल्यानंतर सिराजने 12 स्थानांची झेप घेतली. यामध्ये पाच विकेट्सचा समावेश होता. यामुळे भारताने यजमानांना रोमांचक सामन्यात सहा धावांनी पराभूत करून मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली.
शेवटच्या दिवशी इंग्लंडला 35 धावांची आवश्यकता होती तर भारताला चार विकेट्सची गरज होती. दरम्यान, सिराजने गस अ?टकिन्सनसह तीन फलंदाजांना बाद करून भारताला उल्लेखनीय विजय मिळवून दिला. सिराजची आतापर्यंतची सर्वोत्तम आयसीसी रँकिंग गेल्यावषी जानेवारीमध्ये 16 वे स्थान होते. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यात तीन सामने खेळत असून 889 गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.
प्रसिद्ध कृष्णानेही सिराजसह एका कसोटीच्या दोन्ही डावात प्रत्येकी चार किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारी दुसरी भारतीय जोडी बनल्यानंतर कारकिर्दीतील सर्वोत्तम 59 वे स्थान मिळवले. यापूर्वी 1969 मध्ये दिल्लीत ऑस्ट्रेलियाविऊद्ध फिरकी गोलंदाज बिशन बेदी आणि इरापल्ली प्रसन्ना यांनी हा पराक्रम केला होता. भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल ओव्हल येथील मालिकेतील दुसरे शतक झळकावल्यानंतर कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा पहिल्या पाचमध्ये परतला. जयस्वालने तीन स्थानांनी प्रगती केली आहे आणि त्याचे 792 गुण आहेत. तर टॉप-10 मध्ये भारताचा एकमेव फलंदाज ऋषभ पंत आहे. तो पायाच्या दुखापतीमुळे पाचवी कसोटी खेळू न शकल्याने एका स्थानाने घसरून आठव्या स्थानावर पोहोचला आहे.
इंग्लंडचा करिष्माई फलंदाज जो रूटने तिन्ही सामन्यांमध्ये तिसरे शतक झळकावून अव्वल स्थानावर आपले स्थान मजबूत केले आहे. तर हॅरी ब्रूकच्या 98 चेंडूत 111 धावांमुळे तो पुन्हा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजी विभागात, इंग्लंडचे वेगवान गोलंदाज अॅटकिन्सन आणि जोश टँग यांनीही सामन्यात प्रत्येकी आठ बळी घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. अॅटकिन्सन पहिल्यांदाच टॉप-10 मध्ये तर टँग 14 स्थानांनी पुढे जाऊन 46 व्या स्थानावर आहे.









