गजानन पाटील यांचा उपक्रम
वार्ताहर /किणये
सध्या तालुक्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. पहाटे व सायंकाळी थंडीमुळे साऱ्यांनाच घरातून बाहेर पडणे अवघड वाटते. मात्र थंडी, ऊन, पाऊस याची तमा न बाळगता देसूर येथील गजानन पाटील हे शिवभक्त वर्षभरापासून दररोज नियमित राजहंसगडाची पायी सर करतात. छ. शिवाजी महाराज व राजहंसगडाबद्दल त्यांच्या मनात प्रचंड प्रेम आहे. आपल्याला रोज या गडावर येण्यामुळे एक वेगळीच स्फूर्ती मिळते. त्यासाठी रोज सकाळी राजहंसगडावर जात आहे, असे या शिवभक्तांने सांगितले. तालुक्यात राजहंसगड हा एकमेव किल्ला आहे. गतवर्षी या गडावर शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उभारली आहे. गडाचे सौंदर्यीकरणही केले आहे. यामुळे अलीकडच्या काळामध्ये पर्यटनासाठी म्हणून राजहंसगडावर जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. इथले निसर्गसौंदर्य साऱ्यांनाच भुरळ पाडत आहे.
देसूर गावचे तरुण गजानन पाटील हे राजहंसगड रोड जवळील कमानीपासून रोज चालत गडावर ये-जा करतात. हा नित्याचा त्यांचा साडेचार किलोमीटरचा पायी प्रवास होतो. राजहंसगडावर गेल्यानंतर सिद्धेश्वराचे व छत्रपती शिवरायांचे दर्शन घेतो, असे त्यांनी सांगितले. कधी कधी माझ्यासोबत काही मित्रमंडळीही येत असतात. त्यांनाही या ठिकाणी आल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो. पण या उपक्रमात साऱ्यांनाच सातत्य ठेवणे जमत नाही. मात्र शिवरायाप्रती गजानन पाटील ध्येयवेडे आहेत. त्यामुळेच ते रोज राजहंसगडाची सर करतात. गुरुवारी सकाळी गजानन पाटील यांचा सत्कार सतीश काळसेकर, रघुनाथ सावंत, संतोष बोंगळे, जोतिबा काळसेकर, विलास रेडेकर, पशराम काळसेकर आदींनी केला.









