कोल्हापूर :
कोण म्हणतोय, साहेब मी प्यायलो नाही हो..तर कोण फोनवर बोलतोय, भाई मॅटर झालाय लवकर ये..तर कोण म्हणतंय,मला एकदा माफ करा की पहिल्यांदाच घेतली हो. अशी विनवणी करत वाहतूक शाखेत रंगलेल्या व नशेत झिंगलेल्या तरुणाईची फोनाफोनी चालली होती.
रंगपंचमी दिवशी कोल्हापूर वाहतूक पोलीसांनी शहरातील प्रत्येक चौकाचौकात नाकाबंदी केली होती. यावेळेस ट्रिपल शीट, सायलेन्सर काढून गाडी फिरवणारे, ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह व हुल्लडबाजीवर शहरात संध्याकाळपर्यंत 559 जणांवर कारवाई करुन लाखोंचा दंड आकारण्यात आला. जे ट्रिपल सिट, सायलेन्सर काढलेले व हुल्लडबाज होते यांच्यावर जागेवर कारवाई करण्यात येत होती. पण जे मद्यपी होते त्याना वाहतूक शाखेत आणून कारवाई करण्यात येत होती.
रंगपंचमी दिवशी मद्यपान करणे हे काही जणांचे ठरलेला कार्यक्रम असतो. पण मद्यपान करुन गाडी चालवणे हा गुन्हा असून आपल्या बरोबर दुसर्याचा जीव धोक्यात घालणे हे बरोबर नाही म्हणून वाहतुक शाखेने दिवसभर कारवाई केली. पण एकदा का पोलीसांनी पकडले की या तरुणाची भंबेरी उडत असल्याचे चित्र काल वाहतूक शाखेत दिवसभर दिसत होते. यातच हे तरुण वाहतूक पोलीसांना विनवणी करतानाही दिसत होते. त्यात काहीजणांना नीट उभारता येत नव्हते. ते देखील पोलीसांना सांगत होते की, मी पियालो नाही, पहिल्यांदाच घेतली, एकदा माफ करा अशी विनंती करत होते. यावरून रंगपंचमी दिवशी वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांसह आलेल्या वाहनधारकाच्यांत हास्याची लकेर उमटत होती.
- मी काय मर्डर केलाय होय
एक परप्रांतीय तरुण नुकत्याच नवीन आलेल्या साहेबांना शहरात फिरती करत असताना ड्रंक अन्ड ड्राईव्ह मध्ये सापडला. नंतर त्याला वाहतूक शाखेत आणून कागदपत्र करत असताना नाव, गाव, लायसन्स नंबर, मोबाईल नंबर, आधारकार्ड नंबर हे सर्व विचारल्यावर तो पोलिसांना नशेत विनवणी करत होता, मी कधीतरीच घेतो, पण पोलीस त्यांचे काम करत होते. ते ऐकत नाहीत हे पाहून तो चिडून म्हणाला, मी काय मर्डर केलाय होय यव्हडं सगळ लिहून घेताय.








