निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक आयोग सोमवारी देशव्यापी विशेष सघन सुधारणा (एसआयआर) म्हणजेच मतदारयादी फेरसर्वेक्षण कार्यक्रम जाहीर करणार आहे. आयोगाच्यावतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून त्यात राज्यनिहाय तारखा आणि तपशील जाहीर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 ते 15 राज्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने पुढील वर्षाच्या आत विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांचा समावेश असेल. 2026 मध्ये आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने ही सर्व राज्ये पहिल्या टप्प्यात समाविष्ट असतील. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये सद्यस्थितीत मतदारयादी सर्वेक्षण होणार नसल्याचे संकेत आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. निवडणुकीनंतर या राज्यांमध्ये ‘एसआयआर’ आयोजित केला जाणार आहे.
‘एसआयआर’ लागू करण्यासाठीची प्रक्रिया अंतिम करण्यासाठी आयोगाने अलीकडेच राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत दोन बैठका घेतल्या होत्या. अनेक सीईओंनी त्यांच्या शेवटच्या एसआयआर नंतर जाहीर केलेल्या मतदारयाद्या संबंधित राज्यांच्या वेबसाईटवर अपलोड केल्या आहेत. बिहारमध्येही अलीकडेच मतदार पडताळणी झाली असून अंतिम डेटा 1 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. आता अन्य राज्यांमध्ये बिहारप्रमाणेच मतदारयाद्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभापासून ही प्रक्रिया सुरू होऊ शकते.
बिहारमध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता संपूर्ण देशात मतदारयाद्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. 2026 मध्ये आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पाच राज्यांव्यतिरिक्त पहिल्या टप्प्यात काही इतर राज्यांमध्येही एसआयआर प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. बिहारमध्ये राजकीय विरोध डावलून निवडणूक आयोगाने मतदारयादी सर्वेक्षणाची मोहीम पूर्ण केली. या सर्वेक्षणाअंती अंदाजे 7.42 कोटी नावे असलेली अंतिम यादी 30 सप्टेंबर रोजी प्रकाशित करण्यात आली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी यासंबंधीची माहिती देताना सर्व राज्यांमध्ये मतदारयाद्यांचे सखोल पुनरावलोकन सुरू करण्याचे काम सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. ‘एसआयआर’चे हे काम कधी सुरू करायचे याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोग आज जाहीर करणार आहे.









