वृत्तसंस्था/ सेंट लुईस, अमेरिका
आज सोमवारपासून सुरू होणाऱ्या सिंकफिल्ड कपमध्ये प्रतिष्ठित बुद्धिबळपटूंचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला जागतिक विजेता डी. गुकेश या स्पर्धेच्या माध्यमातून क्लासिकल बुद्धिबळकडे परतला असून आर. प्रज्ञानंदही ग्रँड चेस टूरच्या पाचव्या टप्प्यात मुसंडी मारण्यावर लक्ष केंद्रीत करेल, जेणेकरून त्याचे एकंदरित पाचवे स्थान मजबूत होईल.
अनेकांचा असा युक्तिवाद केला आहे की, जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनशिवाय हे मैदान अपूर्ण वाटते. परंतु नॉर्वेजियन ग्रँडमास्टरने उघडपणे कबूल केले आहे की, त्याला आता क्लासिकल बुद्धिबळ आवडत नाही. कार्लसनशिवाय ग्रँड चेस टूरची घोषणा करण्यात आलेली असून हा शेवटचा टप्पा आहे जेथून खेळाडू या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
अमेरिकेचा फॅबियानो काऊआना, फ्रान्सचा अलिरेझा फिरोजा आणि फॉर्ममध्ये असलेला आर्मेनियन-अमेरिकन लेव्हॉन अॅरोनियन हे भारतीय जोडीसाठी एक कठीण आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. परंतु उर्वरित खेळाडू देखील खूपच प्रभावी आहेत. कारण या वर्षीच्या ग्रँड चेस टूरसाठी निवडलेले सर्व नऊ खेळाडू एकत्र स्पर्धा करतील. जलद स्वरुपांतील सध्याचा फॉर्म पाहता गुकेश कदाचित येथे भक्कम दावेदारांपैकी एक नसेल, परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की, क्लासिकल बुद्धिबळ हे भारतीय ग्रँडमास्टरचे बलस्थान आहे.
दरम्यान, प्रज्ञानंदने पुढील वर्षीच्या पॅंडिडेट्स स्पर्धेसाठी पात्रता मिळवून आधीच आपले स्थान बळकट केले आहे. कँडिडेट्स स्पर्धेतूनच जागतिक विजेतेपदासाठी गुकेशचा आव्हानवीर ठरेल. गुकेश आणि प्रज्ञानंद या दोघांनीही पुढील महिन्यात उझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या ग्रँड स्विसमध्येही भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सर्व काही जिंकण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा अधोरेखित झाली आहे. जीसीटी क्रमवारीत प्रज्ञानंद सध्या गुकेशच्या पुढे आहे. परंतु अनुभवी प्रतिस्पर्ध्यांचा सामना करताना त्यांच्यासाठी सातत्य महत्त्वाचे असेल.
त्यापैकी, मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह हा अजूनही पराभूत करण्यास कठीण खेळाडू आहे, तर 42 वर्षीय अॅरोनियनने पुन्हा एकदा सर्वोत्तम फॉर्म मिळविला आहे. या माजी जागतिक कनिष्ठ विजेत्याने आणि विश्वचषक विजेत्याने गेल्या काही आठवड्यांत दोन जेतेपदे जिंकली आहेत. त्यात लास वेगासमधील फ्रीस्टाइल बुद्धिबळ आणि सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झचा समावेश होतो. पण ही स्पर्धा क्लासिकल बुद्धिबळाची आहे आणि त्याचे चाहते पुन्हा एकदा त्याचा खेळ पाहण्यास उत्सुक आहेत. 10 खेळाडूंमध्ये नऊ फेऱ्यांत खेळविल्या जाणार असलेल्या या स्पर्धेत एकूण 3,50,000 अमेरिकन डॉलर्सची बक्षिसे ठेवलेली आहेत.









