वृत्तसंस्था/ सेंट लुईस, अमेरिका
ग्रँड चेस टूरचा भाग असलेल्या सिंकफिल्ड कपच्या सहाव्या फेरीत भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सलग पाचवी बरोबरी साधली आणि पोलंडच्या जान-क्रिज्स्टोफ दुडासोबत गुण विभागून घेतले. या निकालासह प्रज्ञानंद सहा सामन्यांमधून 3.5 गुणांवर पोहोचला आहे आणि त्याने संयुक्तरीत्या दुसरे स्थान कायम राखले आहे.
दरम्यान, अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो काऊआना 4 गुणांसह आपली आघाडी कायम ठेवत अर्ध्या गुणाने पुढे आहे. प्रज्ञानंदला साथ देणारा अमेरिकन लेव्हॉन अॅरोनियन आहे. विश्वविजेता डी. गुकेश अमेरिकेचा वेस्ली सो आणि सॅम्युअल सेव्हियन आणि फ्रेंच जोडी अलिरेझा फिरोजा आणि मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह यांच्यासोबत 3 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. सहाव्या फेरीत गुकेशने आणखी एका धक्क्यातून बचाव केला आणि फिरोजासोबत सामना बरोबरीत संपविला.
दुसऱ्या एका सामन्यात काऊआनाने सेव्हियनसोबतचा सामना बरोबरीत सोडविला आणि नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हने वाचियर-लाग्रेव्हविऊद्धही तोच निकाल मिळवला. वेस्ली सोविरुद्ध अॅरोनियनचा सामनाही त्याच दिशेने गेला. सलग दुसऱ्या दिवशी सर्व सामने बरोबरीत सुटले. प्रज्ञानंदने दुडाच्या सिसिलियन बचावाविऊद्ध अलापिन व्हेरिएशन निवडले आणि काही प्रमणात फायदाही मिळवला. तथापि, निर्णायक निकाल यातून लागू शकला नाही. हा सामना फक्त 32 चाली इतका चालला.
गुकेशने पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना ‘किंग पॉन’सह सुऊवात केली आणि सिसिलियन बचावाचा सामना केला. फिरोजाने मधल्या टप्प्यात कल्पकतेने खेळ करून पारडे थोडे भारी केले होते. तथापि, चांगल्या बचावामुळे गुकेश सावरला. दुसरीकडे, काऊआनाचा सेव्हियनबरोबरचा सामना फक्त 27 चालींमध्ये बरोबरीत संपला.









