वृत्तसंस्था/ सेंट लुईस, अमेरिका
ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत जागतिक विजेता डी. गुकेशला नमवत ‘लाईव्ह वर्ल्ड’ क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तो आता अमेरिकेच्या रोखण्यास कठीण वाटणाऱ्या लेव्हॉन अॅरोनियनसह आघाडीवर आहे. अॅरोनियनने पहिल्या फेरीत उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हला नमविले.
पहिल्या फेरीतील इतर सामन्यांमध्ये अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाने पोलंडच्या डुडा जान-क्रिजस्टोफशी बरोबरी साधली, तर वाइल्ड कार्डवर प्रवेश मिळालेल्या सॅम्युअल सॅव्हियनने अमेरिकी सहकारी वेस्ली सोसोबतच्या लढतीला बरोबरीत सोडवत गुण विभागून घेतले. फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्हनेही आणखी एक फ्रेंच खेळाडू अलिरेझा फिरोजासोबत बरोबरी साधली. 3,50,000 अमेरिकन डॉलर्स रकमेची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत अजून आठ फेऱ्या बाकी असताना प्रज्ञानंद आणि अॅरोनियन यांच्यानंतर सहा खेळाडू संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. गुकेश आणि अब्दुसत्तोरोव्ह पुढील फेरीत आपापले खाते उघडण्याची आशा बाळगून असुन ते गुणतालिकेत तळाशी आहेत.
प्रज्ञानंदला काळ्या सोंगाट्या घेऊन खेळणाऱ्या गुकेशने स्वीकारलेल्या ‘क्वीन्स गॅम्बिट’चा सामना करावा लागला. पण पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळत असल्याने त्याला एक वेगळा फायदा मिळाला. पुढे स्वत:साठी परिस्थिती आणखी बिकट बनविलेल्या गुकेशला वेळही कमी पडला आणि खेळात टिकून राहण्यासाठी त्याला काही कठीण चाली शोधाव्या लागल्या. दुसरीकडे, प्रज्ञानंदने स्थिती हातातून निसटू दिली नाही. हा सामना फक्त 36 चाली चालला. ‘आज काय घडले हे मला खरोखर माहीत नाही. मला वाटते की, तो थोडासा अस्वस्थ होता’, असे लढतीनंतर प्रज्ञानंद म्हणाला.
योगायोगाने या विजयासह प्रज्ञानंदने क्लासिककल स्वरूपात गुकेशशी बरोबरी साधली असून या प्रकारात दोघांनीही प्रत्येकी तीन विजय मिळवले आहेत. ‘गेल्या वर्षी मी त्याच्याविऊद्ध चांगल्या स्थितीत असतानाही गोंधळ घातला होता. मला वाटते की, मी जवळजवळ दोन वर्षांपासून त्याला (क्लासिकल स्वरुपात) हरवले नव्हते. त्यामुळे शेवटी विजय प्राप्त करणे हे चांगलेच आहे’, असे प्रज्ञानंद म्हणाला. दुसरीकडे, काळ्या राजावर हल्ला करण्याचा बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर नोदिरबेकची ऊर्जा संपली आणि त्यासरशी अॅरोनियनने प्रतिहल्ला करण्यास सुऊवात केली. उझबेक ग्रँडमास्टरकडे पांढऱ्या सोंगाट्या आणि थोडीशी अनुकूल स्थिती होती, परंतु अमेरिकी खेळाडू स्थिर राहिला. हा सामना खरे तर बरोबरीत सुटायला हवा होता. परंतु पुढे अब्दुसत्तोरोव्ह गोंधळला आणि तो वाईटरीत्या हरला.









