वृत्तसंस्था/ सेंट लुईस, अमेरिका
भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने विद्यमान विश्वविजेत्या चीनच्या डिंग लिरेनला येथील सिंकफिल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील उत्सुकता लागून राहिलेल्या लढतीत बरोबरीत रोखले. मात्र या सामन्यात खरी झुंज झाली असे वाटले नाही. कारण या वर्षाच्या अखेरीस आव्हानवीर गुकेश आणि लिरेन यांच्यात जागतिक विजेतेपदासाठी लढत होणार आहे. त्यामुळे त्यांनी आपली खरी तयारी उघड करणे टाळले.
सेंट लुईस रॅपिड व ब्लिट्झ स्पर्धेत शेवटच्या स्थानावर राहावे लागलेल्या ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने त्या निराशाजनक प्रदर्शनानंतर सुऊवातीच्या लढतीत उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हशी बरोबरी साधताना काही सुधारणा केल्या. प्रज्ञानंदला सावरण्यासाठी फारसा वेळ मिळालेला नसला, तरी मागील स्पर्धेतील खराब कामगिरी त्याने मागे टाकली आहे, असे दिसून आले. फक्त 36 चालींमध्ये हा सामना बरोबरीत सुटला.
फ्रान्सच्या अलिरेझा फिरोजाने सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेतील फॉर्म कायम ठेवताना ग्रँड चेस टूर रँकिंगसाठीच्या महत्त्वाच्या लढतीत अमेरिकन फॅबियानो काऊआनाचा पराभव केला. काही दिवसांपूर्वी संपलेल्या रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर आता फिरोजा हा काऊआनाकडून या स्पर्धेचा किताब खेचून घेण्याच्या बाबतीत आघाडीचा दावेदार बनला आहे. दहा खेळाडूंच्या या दुहेरी राऊंड रॉबिन स्पर्धेत आणखी आठ फेऱ्या होणार आहेत.









