अंतिम फेरीत मदेवेदेव्हवर मात, महिला दुहेरीत एलिस मर्टेन्स-सु-वेई अजिंक्य
वृत्तसंस्था/ मेलबर्न
इटलीच्या चौथ्या मानांकित यानिक सिनरने ऐतिहासिक जेतेपद नोंदवताना ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या एकेरीच्या अंतिम फेरीत रशियाच्या तिसऱ्या मानांकित मेदवेदेव्हला पाच सेट्सच्या झुंजार लढतीत हरविले. ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकणारा तो पहिला इटालियन टेनिसपटू बनला आहे. महिला दुहेरीत तैवानची सीह सु-वेई व बेल्जियमची एलिस मर्टेन्स यांनी जेतेपद पटकावले.
दीर्घकाळापसून या स्पर्धेवर वर्चस्व गाजवलेल्या अग्रमानांकित जोकोविचला 22 वर्षीय सिनरने आधी उपांत्य फेरीत धक्का दिला, त्यानंतर अंतिम फेरीत मेदवेदेव्हला नमवित जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. त्याने दोन सेट्सची पिछाडी भरून काढत डॅनिल मेदवेदेव्हवर 3-6, 3-6, 6-4, 6-4, 6-3 अशी मात केली. ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा तो 48 वर्षानंतरचा पहिला इटालियन खेळाडू बनला आहे. यापूर्वी 1976 मध्ये अॅड्रियानो पानाटाने फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. 2021 चा यूएस ओपन चॅम्पियन मेदवेदेव्हचा हा सहा ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीतील पाचवा पराभव आहे. तिसऱ्या मानांकित मेदवेदेव्हला या स्पर्धेत पाच सेट्सच्या चार लढती खेळण्याचा विक्रम नोंदवला. याशिवाय तो सर्वाधिक वेळ कोर्टवर खेळण्याचा कार्लोस अल्कारेझचा 23 तास 40 मिनिटांचा विक्रमही मागे टाकला. अल्कारेझने 2022 यूएस ओपनमध्ये हा वेळेचा विक्रम केला होता. मेदवेव्हला याआधी लागोपाठच्या दोन अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. 2021 मध्ये जोकोविचने त्यानंतर राफेल नदालने त्याला हरविले होते. सिनरने यावेळी सहा फेऱ्यांत फक्त एक सेट गमविला, तोही जोकोविचविरुद्ध. अंतिम फेरीत मात्र त्याला दोन सेट्स गमवावे लागले.
सु-वेई-मर्टेन्स महिला दुहेरीत अजिंक्य
महिला दुहेरीत तैवानची सीह सु-वेई व बेल्जियमची एलिस मर्टेन्स यांनी जेतेपद पटकावताना अंतिम फेरीत लॅटव्हियाची एलेना ओस्टोपेन्को व युक्रेनची ल्युडमिला किचेनॉक यांचा 6-1, 7-5 असा पराभव केला. या दुसऱ्या मानांकित जोडीचे हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. याआधी 2021 मध्ये त्यांनी विम्बल्डनचे जेतेपद पटकावले होते. 36 वर्षीय सीह सु-वेई ग्रँडस्लॅममध्ये महिला दुहेरीचे जेतेपद मिळविणारी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वयस्कर महिला बनली आहे. सु-वेईने महिला दुहेरीत सात अजिंक्यपदे मिळविली असून शुक्रवारी तिने येथे मिश्र दुहेरीचे जेतेपद मिळविले आहे. अंतिम लढतीचा पहिला सेट एकतर्फी झाला तर दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही जोड्यांत जोरदार चुरस पहावयास मिळाली.