वृत्तसंस्था/ रोम
जेनिक सिनरने येथे सुरू असलेल्या इटालियन ओपन स्पर्धेत शेवटच्या सोळा फेरीत स्थान मिळविताना हॉलंडच्या पात्रता फेरीतून आलेल्या जेस्पर डी जाँगचा पराभव केला.
अव्वल मानांकन मिळालेल्या सिनरने डी जाँगवर 6-4, 6-2 अशी मात केली. डोपिंग निलंबनानंतर पुनरागमन केल्यावर त्याचा हा दुसरा सामना होता. 12 व्या मानांकित टॉमी पॉलने टॉमस मॅकहॅकचा 6-3, 6-7 (5-7), 6-4 असा पराभव करून आगेकूच केली. सिनरचे पुढील लढत 17 वा मानांकित फ्रान्सेस्को सेरुंडोलोशी होईल. सेरुंडोलोने ऑस्ट्रियाचा पात्रता फेरीतून आलेला खेळाडू सेबॅस्टियन आफनरवर 6-2, 6-4 अशी मात केली. अॅलेक्स डी मिर्नारनेही चौथी फेरी गाठली असून त्याने बोलिव्हियाच्या ह्युगो डेलियनचा पराभव केला.
महिलांमध्ये अमेरिकेच्या कोको गॉफने ब्रिटनच्या एम्मा राडुकानूचा 6-1, 6-2 असा पराभव केला तर पेटॉन स्टीयर्सने जपानच्या नाओमी ओसाकावर 6-4, 3-6, 7-6 (7-4) अशी मात केली. सुमारे पावणेतीन तास ही लढत रंगली होती. आधीच्या सामन्यात तिने ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन मॅडिसन कीजला पराभवाचा धक्का दिला होता. त्याचप्रमाणे जस्मिन पावोलिनीने 2017 ची प्रेंच ओपन चॅम्पियन एलेना ओस्टापेन्कोचे आव्हान 7-5, 6-2 असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरी गाठली.









