सातारा :
गणेशोत्सव काही दिवसांवर येवून ठेपला आहे. गणेशोत्सवाची तयारी मंडळांची सुरु आहे. मंडळांना लागणारे विविध परवाने हे एकाच छताखाली मिळावेत अशी गणेशोत्सव मंडळाची मागणी होती. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे मंडळांच्या समन्वय समितीने मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने दि. 11 ऑगस्टपासून एक खिडकी योजना सुरु करण्यात येणार असल्याची ग्वाही पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मंडळाच्या शिष्टमंडळास दिली.
गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळाच्या विविध परवानग्या घेण्यासाठी कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. तेथे प्रत्येक कागद काढून कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यासाठी नाहक वेळ आणि पैसा मंडळांच्या कार्यकर्त्यांचा जातो. त्यामुळे सर्व परवानग्या या एकाच छताखाली देण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी गणेशोत्सव समन्वयक समितीच्यावतीने छत्रपती शाहु कला मंदिर येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या उपस्थितीत झालेल्या दि. 30 रोजीच्या बैठकीत करण्यात आली होती. त्यानंतर दि. 6 ऑगस्ट रोजी समन्वयक समितीचे शिष्टमंडळ आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यामध्ये चर्चा झाली. समन्वयक समितीच्या शिष्टमंडळाने येणाऱ्या अडीचणी त्यांच्याकडे कथन केल्या. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी एक खिडकी योजना दि. 11 ऑगस्ट पासून सुरु करण्यात येईल. त्या योजनेच्या माध्यमातून नगरपालिका, सातारा शहर पोलीस, शाहुपुरी विभाग, वाहतूक शाखा, वीज वितरण व धर्मादाय विभाग हे एकाच ठिकाणी परवाने देतील, असे त्यांनी आश्वासित केले.








