देशातील सर्वांत मोठे तंतुवाद्य, सरस्वती तंतुवाद्य केंद्रामध्ये निर्मिती
मानसिंगराव कुमठेकर/मिरज
‘तंतुवाद्याचे माहेरघर’ म्हणून जगभर ख्याती असलेल्या मिरजेत तब्बल 12 फुट उंचीची एकतारी तयार झाली आहे. सरस्वती तंतुवाद्य केंद्राचे तंतुवाद्य निर्माते साजीद सतारमेकर यांनी ही एकतारी तयार केली आहे. देशातील आजवरचे हे सर्वांत मोठे तंतुवाद्य आहे. या भव्य एकतारीमुळे तंतुवाद्य निर्मितीसाठी प्रसिध्द असणाऱया मिरज शहराच्या लौकिकात भर पडली आहे.
मिरज शहर हे तंतुवाद्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. गेली 160 वर्षे या शहरात तंतुवाद्य निर्मिती सुरू आहेत. शहरातील आद्य तंतुवाद्य निर्माते फरीदसाहेब सतारमेकर यांच्या अथक प्रयत्नातून पहिले तंतुवाद्य या शहरात बनले. त्यानंतर गेल्या शतकभरात तंतुवाद्याची मोठी बाजारपेठ येथे वसली आहे. 20 हून अधिक दुकानांमधून 100 हून अधिक कारागीर काम करीत आहेत. देशात आणि देशाबाहेरही मोठय़ा प्रमाणात ही तंतुवाद्ये विक्री होतात. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक गायक-वादक मिरजेतीलच वाद्यांना पसंती देतात. भारतीय शास्त्राrय संगीताची आवड असलेले परदेशी नागरिकही मिरजेतील वाद्यांची मागणी करतात.
पारंपारिक वाद्यनिर्मितीबरोबरच येथील कारागिरांनी तंतुवाद्य निर्मितीमध्ये अनेक प्रयोग वेळोवेळी केले आहेत. कलाकारांना आवश्यक असणारे बदल वाद्यांमध्ये करत प्रयोगशीलता जोपासली आहे. फोल्डिंग तानपुरा, काचेच्या बिलोरी हंडय़ाचा तानपुरा, शहामृगाच्या अंडय़ाचा तानपुरा यांसह पारंपारिक आणि परदेशी वाद्यांचे फ्युजन असलेली तंतुवाद्ये येथील कारागिरांनी आजवर तयार केली आहेत. प्रयोगशीलता हे या कारागिरांचे वैशिष्टय़ आहे. मिरजेतील तंतुवाद्य कारागिरांनी आजवर प्रयोगशीलता जोपासत विविध प्रकारची तंतुवाद्ये तयार केली आहेत.
शहरातील बुवाच्या हौदाजवळ असणाऱया सरस्वती तंतुवाद्य केंद्राचे संचालक अलताबहुसेन आणि त्यांचे बंधू साजीद यांनीही वेळोवेळी दुर्मिळ तंतुवाद्ये तयार केली आहे. नुकतेच त्यांनी तब्बल 12 फुट उंचीची एकतारी तयार केली आहे. मिरजेत आजवर तयार झालेल्या तंतुवाद्यांपैकी हे सर्वांत मोठे तंतुवाद्य आहे. हे वाद्य पुणे येथील एका कलाकाराने केलेल्या मागणीनुसार बनविण्यात आले आहे. यासाठी सुमारे 60 इंचाचा घेर असलेला मोठा भोपळा वापरण्यात आला आहे. हे वाद्य तयार करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला. साजीद सतारमेकर यांनी हे वाद्य काळजीपूर्वक बनविले आहे. याकामी त्यांना ज्येष्ठ बंधू अलताबहुसेन सतारमेकर यांचे सहाय्य लाभले आहे.
पारंपारिक आकारापेक्षा मोठी एकतारी बनविताना त्याच्या मुळच्या वादनात फरक पडणार नाही, याचीही दक्षता घेण्यात आली. या सर्वांत उंच एकतारीच्या निर्मितीबद्दल अनेक कलाकारांनी सतारमेकर बंधूचे कौतुक केले आहे. मिरजेत तयार झालेली ही तब्बल 12 फुट उंचीची वैशिष्टय़पूर्ण एकतारी तंतुवाद्य निर्मितीच्या लौकिकात भर घालणारी आहे. इथल्या प्रयोगशील तंतुवाद्य कारागिरांना प्रोत्साहन देणारी आहे.
देशातील सर्वांत मोठे तंतुवाद्य
सरस्वती तंतुवाद्य केंद्रात तयार झालेली ही 12 फुट उंचीची एकतारी ही देशात आजवर तयार तंतुवाद्यांपैकी सर्वांत मोठे वाद्य आहे. यासाठी मोठय़ा उंचीचा खास वेळू शोधून तो वापरण्यात आला आहे. सर्वांत मोठय़ा भोपळय़ाचा वापरही यासाठी करण्यात आला आहे. या एकतारीचे टय़ुनिंग दर्जेदार व्हावे, यासाठी विशेष दक्षताही घेण्यात आली आहे.