अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळींना ऊर्जा मंत्र्यांचे आश्वासन
बेळगाव : शेतकरी व विद्यार्थ्यांच्या अनुकुलतेसाठी रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन वीजमंत्री के. जे. जॉर्ज यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी वरील आश्वासन दिले. अरभावी मतदारसंघातील अनेक गावात बहुतेक लोक शेतात वास्तव्य करून आहेत. मुख्य वीजवाहिन्यांपासून शेतातील घरे लांब आहेत. त्यांना निरंतर ज्योती योजनेंतर्गत वीजपुरवठा करणार का? असा प्रश्न भालचंद्र जारकीहोळी यांनी उपस्थित केला होता. मुख्य वीजवाहिनीपासून शेतातील घरे लांब असल्यामुळे त्यांना तांत्रिकरीत्या या योजनेंतर्गत वीज पुरवणे शक्य नसल्याचे के. जे. जॉर्ज यांनी उत्तरात म्हटले आहे. 24 तास थ्री फेज वीज देण्यासाठी, पथदीपांसाठी, शेतीसाठी ठरावीक वेळेत वीजपुरवठा करण्यासाठी निरंतर ज्योती योजना आहे. अरभावी मतदारसंघात मुख्य वीजवाहिनीपासून शेतातील घरांचे अंतर खूप आहे. त्यामुळे निरंतर ज्योती वीजवाहिनीच्या माध्यमातून वीजपुरवठा करणे शक्य होणार नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या अनुकुलतेसाठी सात तास थ्री फेज वीज दिली जात आहे. प्रकाशासाठी सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत केवळ ठरावीक उपयोगासाठी सिंगल फेज वीजपुरवठा करण्यात येत असल्याचे वीजमंत्र्यांनी सांगितले.









