पंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू : आरक्षणविषयी उमेदवारामध्ये नाराजी,प्रस्तापितांना काही ठिकाणी घरी बसावे लागणार
प्रतिनिधी /म्हापसा
राज्यातल्या 186 पंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर झाल्या आहेत. या निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली असून बार्देश तालुक्यातून 33 पंचायतीमधून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी लता विश्वजित परब यांनी आपला अर्ज निर्वाचन अधिकारी कृष्णा गावस यांच्याकडे सादर केला. आज पहिल्याच दिवशी बार्देश तालुक्यातील विविध पंचायतीमधून इच्छुक पंच सदस्यांनी मामलेतदार कार्यालयात येऊन निवडणुकीचे अर्ज घेऊन गेले. येत्या गुरुवारी अर्ज भरण्यासाठी चांगला दिवस असल्याने बहुतेक उमेदवार त्या दिवशी आपापले अर्ज सादर करणार आहेत, असे समजते
उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी 10 ते दु. 1 वाजेपर्यंत ठेवली असून यावेळेत अर्ज सादर करावे लागणार आहेत. प्रभाग आरक्षणावरून धुसफूस कायम असून अनेक ठिकाणी नाराजीचे सूर ऐकू येत आहेत. अनेक प्रभागामध्ये मनमानी झाल्याचा आरोप काही पंच सदस्यांनी बोलताना केला. काही ठिकाणी अजूनही घोळ कायम असून काहींनी आपला प्रभाग आरक्षित केल्याने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर उद्या बुधवारी निवाडा झाल्यावर त्या त्या भागातील पंच सदस्यांचे भवितव्य पुढे येणार आहे. आरक्षणावरून बहुतेक प्रस्तापित पंच सदस्यांना घरची वाट पहावी लागणार आहे. काही प्रभाग जाणूनबुजून आरक्षित करण्यात आल्याचा आरोप होत आहे. आहे त्याच स्थितीत निवडणुकीला सामोरे जाण्यापासून पंच सदस्यांकडे अन्य कोणताही पर्याय नाही. मिळालेल्या माहितीनुसार काही पंच सदस्यांनी आपल्या गॉडफादरांकडे धाव घेतली असून राजकीय गॉडफादरही आरक्षणाबाबत नाराज असल्याचे चित्र बार्देशात पहायला मिळत आहे.
उमेदवारांना 25 जुलैपर्यंत आपले उमेदवारी अर्ज भरता येतील सलग आठ दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवधी असल्याने बहुतेक आजी आणि माजी पंच सदस्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना मिळून आपण यावेळी निवडणूक रिंगणात उतरणार असे सांगत आहेत. सध्या जी भाजपा आणि काँग्रेस पक्षात राजकीय चित्र पहायला मिळत असल्याने कार्यकर्तेही नाराज झाले असून कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देता गुपचूप राहून मतदान केलेले बरे असा सूर काही कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळाला.
अचानक घोषित झालेल्या निवडणुका आणि आरक्षणाचा घोळ यामुळे अनेक पंच सदस्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. कांदोळी, कळंगूट, हडफडे, थिवी, हळदोणे, शिरसई, उसकई, वेर्ला-काणका आदी ग्रामपंचायतीच्या सदस्यांना बराच फटका बसला असून या पंचायतीमधून जे कुणी आजवर सरपंच उपसरपंचपदी होते व ज्यांनी भाजपा विरोधात गेल्या विधानसभा निवडणुकीत काम केले होते त्या सर्वांना एका बाजूने घरची वाट दाखविण्यात आली आहे. त्यांच्या प्रभागामध्ये ओबीसी आरक्षण घालून त्यांना अन्य दुसऱया कुठल्याही प्रभागात निवडणूक लढविता येणार नाही त्यादृष्टीने प्रयत्न केले असल्याचे बार्देशातील पंचायतीमधून दिसून आले आहे.
बार्देशातून लता परब यांना पहिला मान
बार्देश तालुक्यातून आसगाव पंचायतीमधील प्रभाग 6 मधून लता विश्वजित परब यांनी पहिल्याच दिवशी सर्वांत प्रथम आपला उमेदवारी अर्ज निर्वाचन अधिकारी कृष्णा गावस यांच्याकडे सादर केला. त्यांना बार्देश तालुक्यातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला मान मिळाला आहे.









