सरस्वती वाचनालयाच्यावतीने कुमार गंधर्व संगीत संमेलनांतर्गत केएलईच्या जिरगे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी /बेळगाव
सरस्वती वाचनालयाच्यावतीने सोमवार दि. 16 रोजी म्हणजेच बुद्ध जयंती दिवशी लोकप्रिय गायक महेश काळे यांच्या गायनाच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. वाचनालयाच्यावतीने दरवषी होणाऱया कुमार गंधर्व संगीत संमेलनांतर्गत केएलईच्या जिरगे सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता ही मैफल होणार आहे.
सरस्वती वाचनालयाची स्थापना 1874 साली झाली. शहापूर येथील प्राथमिक शाळेचे एक शिक्षक कै. सरंजामे गुरुजी यांनी 5-25 पुस्तकांच्या शिदोरीवर घरगुती स्वरुपात हे वाचनालय सुरू केले. ते स्वतः वाचनप्रेमी व साहित्यप्रेमी होते. त्यांनी लोकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी जागा बदलत 50 वर्षांहून अधिककाळ वाचनालय चालविले. त्यानंतर शहापूर येथील नागरिक एकत्र आले. त्यांना तत्कालीन सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांचे सहकार्य लाभले आणि कोरे गल्ली येथे वाचनालयाची भव्य अशी इमारत उभी राहिली. 1874 च्या काळात संगीत शाकुंतलचा पहिला प्रयोग येथेच झाला. एका अर्थाने संगीत नाटकांची मुहूर्तमेढ येथूनच रोवली गेली.
दरम्यान 1932 मध्ये शहापूरमध्ये दुष्काळ पडला. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सांगलीकर सरकार यांनी शहापूरला काही निधी पाठविला. त्याचा योग्य विनियोग करून काही रक्कम शिल्लक राहिली. ही रक्कम आणि स्थानिकांचा आर्थिक पाठिंबा यामधून वाचनालय उभे राहिले. ही इमारत स्थापथ्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. विशेष म्हणजे वाचनालयासाठी बांधलेली राज्यातील ही एकमेव इमारत आहे. हे वाचनालय 1935 ते 55 पर्यंत राज्याश्रयावर चालले. आर्थिक टंचाई सुरू झाल्याने 1955 मध्ये इमारतीचा काही भाग भाडेतत्वावर देण्यात आला. परंतु त्यातूनच वाचनालयाच्या मागे कोर्ट, कचेरीचा ससेमिरा लागला.
याच काळात पी. जी. कुलकर्णी हे अध्यक्ष म्हणून रुजू झाले आणि त्यांनी कोर्टाच्या खेपा पूर्ण करत हा खटला जिंकला व 2007 मध्ये वाचनालय पूर्णपणे कार्यकारिणीच्या ताब्यात आले. तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर आणि विद्यमान विश्वस्त यांनी वाचनालयाला मदतीचा हात दिला. लोकसत्तेच्या सर्व कार्येषु सर्वदा उपक्रमांतर्गत वाचनालयाला भरघोस निधी मिळाला.
कुमार गंधर्व संगीत संमेलन, स्वा. सावरकर, यशवंतराव चव्हाण, बसवेश्वर यांच्या नावाने व्याख्यानमाला चालविल्या जातात. गंधर्व महाविद्यालयाचे केंद्र येथे असून हजारो विद्यार्थी परीक्षेला बसतात. वाचनालयातर्फे बेळगाव भूषण पुरस्कारही दिला जातो. पी. जी. कुलकर्णी यांनी वाचनालयाचे बांधकाम करून विस्तार सुरू केला. परंतु त्यांचे निधन झाले. त्यानंतर स्वरुपा इनामदार, सुहास सांगलीकर आणि विद्यमान कार्यकारिणीने सूत्रे हातात घेतली असून शक्मयतो वाचनालयावर असलेली कर्जफेड करून वाचनालय अधिक सुसज्ज व समृद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महेश काळे यांची मैफल होणार आहे.
देणगी प्रवेशिकांसाठी आवाहन
देणगी प्रवेशिका पीएनजी गाडगीळ सराफ, फायरब्रिगेडसमोर, श्री लक्ष्मी व्यंकटेश एन्टरप्रायझेस 1728, रामदेव गल्ली, आशा कलेक्शन शॉप 8, वास्तुसिद्धी आर्केड अनगोळ मेन रोड, सरस्वती वाचनालय, कोरे गल्ली, शहापूर, असोसिएटेड मेकॅनिकल इंडस्ट्रीज, बँक ऑफ महाराष्ट्राच्या मागे, किर्लोस्कर रोड व किरण एकरकॉन, खानापूर रोड, टिळकवाडी येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी 9449200001 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









