एकाहून एक सरस संगीत मैफलींची अद्भूत अनुभुती : वैश्विक ख्यातीची गायिका शोभा मुदगलच्या मैफलीने समारोप
फोंडा : तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, कला व संस्कृती खाते, गोवा कला अकादमी तसेच राजीव कला मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 17 व्या पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात शनिवार 7 व रविवार 8 रोजी श्रवणीय संगीत मैफलींचा आनंद रसिकांना मिळाला. एकापेक्षा एक सरस अशा संगीत मैफलींची अद्भूत अनुभती रसिकांना प्राप्त झाली. शनिवारी सकाळच्या पहिल्या सत्रात सत्यजित बेडेकर यानी ‘सालकवराळी’ हा प्रभातकालीन राग अंत्यत तयारीने पेश केला. मनोहारी स्वरलगाव आणि ख्यालोपयुक्त मांडणी यामुळे त्याचे गायन रसिकांना भावले. पुर्वांगातील रागतोडी आणि उत्तरांगातील राग अहीर भैरव अशा जेडरागाची समयोचित विस्तार आणि त्यानी उत्तमरित्या पेश केला. त्यांना संवादिनीवर उदय कुलकर्णी तर तबल्यावर प्रेमानंद आमोणकर यांनी जमून साथ दिली.
गोमंतकीय नरेश मडगांवकराच्या संतूरवादनाने रसिक मंत्रमुग्ध
नरेश मडगांवकर या गोमंतकीय कलाकाराने आपल्या संतूरवादनाने रसिकांचे कान तृप्त केले. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ साशिष्य विनोद डिग्रजकर, सुरंजन खंडाळकर, जयतीर्थ मेहुंडी आदी कलाकारांनी आपल्या मैफलीच्या विशिष्ट उंची प्राप्त करून दिली. शुक्रवारी संपन्न झालेल्या सगळ्याच मैफली रसिकांसाठी आनंददायी ठरल्या. स्वर्गीय सुरांची झालेली बरसात ही दीर्घकाळ स्मरणात राहणारी असल्याची मते यावेळी जाण्कारांनी व्यक्त केली. रविवारी गोमंतकीय गायिका तसेच पं. विजय बक्षी यांच्या साशिष्या कु. प्राची जठार यांचे गायन रसिकांचे प्रशंसेचे कारण ठरले. त्यांनी राग विलासखानी तोडी अंत्यत तन्मयतेने पेश केला. शिस्तबद्ध बढत आणि डौलदार विस्तार यामुळे त्dयांचे गाणे रंगले. त्यांना तबल्यावर उत्पल सायनेकर तर संवादिनीवर प्रसाद गावस यांची पोषक साथ लाभली. त्यानंतर युवा गायक आमेल निसाल यानी राग गौरी तोडी ही प्रभातकालीन राग अंत्यत समरसतेने गाऊन रसोत्पती साधली. त्याला जोडूनच पंडितजीच्या ठेवणीतील राग गुणकली सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर रोहिदास परब तर संवादिनीवर उदय कुलकर्णी यांची तोलामोलाची साथ मिळाली.
सुरमयी बासरीवादनाने रसिकांना रिझवले
बासरीवादक षड्ज गोडाखिंडी यांनी आपल्या बासरीवादनाने संपुर्ण सभागृह सुरमयी बनविताना राग वृन्दावनी तोडी पेश केला. रागदारीला उपयुक्त असलेले बारकावे विस्ताराने मांडून त्यांनी जाणकारांकडून वाहव्वा मिळवली. मयांक बेडेकर यांनी त्याना पोषक अशी साथसंगत केली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील नामांकित गायिका सावनी शेंडे राग चारूकेशी गायिला. सुरांवरील प्रभूत्व आणि बंदिशीतील अर्थपुर्णतेच्या माध्यमातून तिने आपले गाणे सर्वार्थाने खुलविले. पंडित भीमसेन जोशी यांची ‘राम रंगी रेगलश’ ही गाजलेली भक्तीरचना गाऊन तिने आपली मैफल आटोपली. तिला संवादिनीवर राया कोरगांवकर व तबल्यावर दयेश कोसंबे यांची समर्पक साथसंगत लाभली.
संगीत महोत्सवात नामवंत गायकांच्या गायनाने रसिक तृप्त
सिद्धार्थ बेलमन्नू या तरूण गायकाने राग मुलतानी प्रभावीपणे सादर केला. निकोप स्वरलगाव सुरेख तानबाजी आणि उपजमधील परिपक्वता यामुळे त्यांच्या गाण्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. संवादिनीवर दत्तराज म्हाळशी तर तबल्यावर दपेश कोसंबे यांची परिपुर्ण साथसंगत लाभली. शुभेंद्र राव यांच्या सतारवादनाने रसिकवर्ग सुखावला. तिलकशाम हा अप्रचलित राग पेश करून त्यांनी आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविले. उत्तम वातावरणनिर्मिती हे त्यांच्या सितारवादनाचे फलित होते. त्यांना तबल्यावर दुर्जय भौमिक यांची अत्युच्च साथ मिळाली. नृत्यांगना नुपूर देठणकर यांचा भरतनाटयम् नृत्dयाचा अविष्कार वैशिष्ट्यापुर्ण ठरला. विविध मुद्रा, अदाकरी, पदलालित्य न्यास आदी नृत्योपयुक्त घटकांच्या माध्यमातून तिने आपले नृत्यकौशल्य प्रदर्शित केले. ओडीयो ट्रॅक संगीताचा यथायोग्य वापर करून नृत्याच्या माध्यमातून तिने जाणकारांनो रिझविले. समापनाच्या कार्यक्रमात वैश्विक ख्यातीच्या गायिका शोभा मुदगल यांची मैफल झाली. त्यानी प्रचलित राग ‘रागेश्री’ सादर केला. मनोहारी बढत स्वर्गसुखाची अनुभुती देणारी बढत, डौलदार आलापी, चपलगतीच्या ताना, यामुळे त्यांचे गाणे रंगतदार झाले. त्यांना तबल्यावर अनीष प्रधान तर संवादिनीवर सुधीर नायक यांनी सुरेख साथसंगत केलवी. यंदाच्या पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात सगळयाच कलाकारांनी संगीताची संस्मरणीय पर्वणी रसिकांना दिली.









