वृत्तसंस्था/ तेहरान
इराणमध्ये युट्यूब गायिकेला हिजाबशिवाय ऑनलाइन कॉन्सर्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. इराणच्या या गायिकेने व्हर्च्युअल कॉन्सर्ट केला होता. परस्तू अहमदीला इराणची राजधानी तेहरानपासून सुमारे 280 किलोमीटर अंतरावरील माजंदरान प्रांतातील सारी शहरातून ताब्यात घेण्यात आले आहे. ऑनलाइन कॉन्सर्टमध्ये तिने चार गायकांसोबत हिजाबशिवाय गायन केले होते. कॉन्सर्टला व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर 1.5 दशलक्षाहून अधिकवेळा पाहिले गेले आहे.
ज्यांच्यावर मी प्रेम करते अशा लोकांसाठी मी गाऊ इच्छिते. हा एक असा अधिकार आहे, ज्याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. मी अशा भूमीसाठी गायन करते, ज्यावर मी मनापासून प्रेम करते असे परस्तूने स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले होते.
इराणमध्ये चित्रित करण्यात आलेला हा संगीत कार्यक्रम प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्यात आला होता. अहमदी आणि त्याच्या चार सदस्यीय सहाय्यक टीमने एक पारंपरिक कारवांसेराई परिसरात एका मंचावरून सादरीकरण केले होते. तिच्या टीममधील दोन पुरुष संगीतकार सोहेल फागीह नासिरी आणि एहसान बेराघदारला देखील अटक करण्यात आली आहे. 1979 च्या इस्लामिक क्रांतिनंतर इराणमध्ये हिजाब परिधान करणे अनिवार्य करण्यात आले होते.









