ऊर्जा-कौशल्य विकाससह अनेक क्षेत्रांसंबंधी चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन शनमुगरत्नम 15 जानेवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा हा दौरा भारत आणि सिंगापूरदरम्यान कूटनीतिक संबंधांना 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त होणार आहे. या दौऱ्यामुळे भारत-सिंगापूर संबंध नव्या शिखरावर पोहोचण्याची अपेक्षा आहे. या दौऱ्यात ऊर्जा, औद्योगिक पार्क आणि कौशल्य विकास यासारख्या बिगर पारंपरिक क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
चालू वर्ष भारत-सिंगापूर संबंधांकरता महत्त्वपूणर्ह राहणार आहे. यानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. वर्षाच्या अखेरीस सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग देखील भारताच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज बैठकीचा पुढील टप्पा काही महिन्यांनी आयोजित होणार आहे. मागील वर्षी मंत्रिस्तरीय बैठक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सप्टेंबर महिन्यातील दौऱ्यानंतर भारत-सिंगापूर संबंधांना व्यापक रणनीतिक भागीदारीच्या स्तरापर्यंत वाढविण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींनी सप्टेंबर महिन्यात सिंगापूरचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात पंतप्रधानांनी सिंगापूरचे राष्ट्रपती शनमुगरत्नम यांची भेट घेतली होती. पंतप्रधानांनी त्यांच्याशी कौशल्य विकास, स्थिरता, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि संपर्कव्यवस्थेसमवेत प्रमुख क्षेत्रांवर केंद्रीत चर्चा केली होती. दोन्ही नेत्यांदरम्यान झालेली चर्चा द्विपक्षीय संबंधांच्या पुर्ण साखळीवर केंद्रीत राहिली होती.
पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी दोन्ही देशांचा संयुक्त इतिहास, विश्वास आणि परस्पर सन्मानावर आधारित मैत्रीची दीर्घ परंपरा आणि अनेक क्षेत्रांमधील व्यापक सहकार्याचा उल्लेख केला होता. राजनयिक, आर्थिक, सुरक्षा, तंत्रज्ञान, शिक्षण आणि सांस्कृतिक संबंधांच्या क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेत दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले होते.









