वृत्तसंस्था / लंडन
कझाकस्थानच्या टेनिसपटू अॅलेक्झांडर बुबलीकने येथे सुरू असलेल्या हॅले ग्रासकोर्ट पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत इटलीचा विद्यमान विजेता आणि टॉपसिडेड जेनिक सिनेरला पराभवाचा धक्का देत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात 45 व्या मानांकित बुबलीकने सिनेरचा 6-3, 3-6, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. गेल्या महिन्यात झालेल्या फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत सिनेर आणि बुबलीक यांच्यात उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडली होती. बुबलीकचा हा सिनेरवरील दुसरा विजय आहे. 2025 च्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेला आता केवळ 10 दिवस बाकी राहिले असताना सिनेरला या अनपेक्षित पराभवाने चांगलाच धक्का मिळाला आहे.
हॅले स्पर्धेत बुबलीकचा पुढील सामना टॉमस मॅकहेक बरोबर होणार आहे. झेकच्या मॅकहेकने हंगेरीच्या मारोझसेनचा 6-2, 6-3 तसेच जर्मनीच्या व्हेरेव्हने इटलीच्या सोनेगोचा 3-6, 6-4, 7-6 (7-2) असा पराभव केला. अर्जेंटिनाच्या टॉमस मार्टिन इचेव्हेरीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने रशियाच्या रुबलेव्हचे आव्हान 6-3, 6-7 (4-7), 7-6 (8-6) असे संपुष्टात आणले. हा सामना तीन तास चालला होता.









