वृत्तसंस्था / सिनसिनॅटी (अमेरिका)
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या सिनसिनॅटी खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय 1000 दर्जाच्या मास्टर्स टेनिस स्पर्धेत इटलीचा टॉप सिडेड जेनिक सिनेर आणि स्पेनचा कार्लोस अल्कारेझ यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इटलीच्या जेनिक सिनेरने फ्रान्सच्या टेरेन्सी अॅटमेनीचा 7-6 (7-4), 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या लढतीतील पहिला सेट चुरशीचा झाल्याने तो टायब्रेकरपर्यंत लांबला. सिनेरने हा पहिला सेट 7-6 (7-4) असा जिंकून आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये फ्रान्सच्या अॅटमेनीकडून फारसा प्रतिकार न झाल्याने सिनेरने हा सेट 6-2 असा जिंकून या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. हार्डकोर्टवरील स्पर्धेतील सिनेरचा हा सलग 12 वा विजय आहे.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेव्हचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश केला. एटीपी टूरवरील स्पर्धेत अल्कारेझने गेल्या काही दिवसांमध्ये सलग सातव्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. 2025 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत इटलीच्या सिनेरने अल्कारेझचा अंतिम सामन्यात 5 सेट्समधील लढतीत पराभव करुन जेतेपद मिळविले होते. या पराभवाची परतफेड करण्याची संधी अल्कारेझला या स्पर्धेत मिळाली आहे. या स्पर्धेमध्ये अल्कारेझने रशियाच्या रुबलेव्हचा तर सिनेरने कॅनडाच्या फेलिक्स ऑगेर अॅलिसीमेचा उपांत्य सामन्यात पराभव करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे.









