लोकसभेतील ‘सिंदूर अभियान’चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताने ‘सिंदूर अभियाना’च्या माध्यमातून आपल्या सामर्थ्याचे आणि आत्मनिर्भरतेचे दर्शन जगाला घडविले आहे. पाकिस्तानला या संघर्षात भारताने प्रचंड दणका दिल्याने त्याला अखेर संघर्ष थांबविण्याची विनंती भारताकडे करावी लागली. या संघर्षात भारताच्या स्वदेश निर्मित शस्त्रास्त्रांनी आपली क्षमता आणि प्रभाव सिद्ध केला आहे. सारे जग या संदर्भात भारताचे गुणगान करत असताना भारतील विरोधी पक्ष मात्र सेनेच्या पराक्रमासंबंधी संशय व्यक्त करीत आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या ‘सिंदूर अभियाना’च्या विषयावर लोकसभेत 16 तासांहून अधिक वेळ चाललेल्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सडेतोड भाषणाने उत्तर दिले. भारताने पाकिस्तानविरोधात जी कार्यवाही केली, ती त्या देशाच्याही अपेक्षेबाहेरची होती. या संघर्षात पाकिस्तानची जी हानी झाली आहे, तिच्यामुळे आजही तो देश आपली झोप गमावून बसला आहे. ‘सिंदूर अभियान’ अद्याप संपलेले नाही. भविष्यात पाकिस्ताने पुन्हा भारताची कळ काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला याहीपेक्षा मोठा धडा शिकविला जाईल, अशी स्पष्टोक्तीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
जुन्या चुका सुधारल्या
दहशतवादासंबंधी कोणतीही तडजोड स्वीकारायची नाही, हे नव्या भारताचे धोरण आहे. केवळ दहशतवादी किंवा त्यांच्या संघटना यांना नव्हे, तर जे देश दहशतवादाचे भरण-पोषण करतात, त्यांनाही दणका दिल्याशिवाय भारत राहणार नाही, हे नवे तत्त्व आम्ही स्वीकारले आहे. शांततेच्या नावाखाली यापुढे दहशतवाद सहन केला जाणार नाही, हे आमचे ‘न्यू नॉर्मल’ किंवा नवे तत्त्व आहे. काँग्रेसच्या काळात तुष्टीकरणाची नीती अवलंबिली गेली. त्यामुळे साऱ्या देशात दहशतवाद फैलावला. या तुष्टीकरणाची अत्यंत मोठी किंमत देशाला भोगावी लागली. आम्ही या चुका आता सुधारत आहोत, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी भाषणात केली.
घटनाक्रम केला स्पष्ट
आपल्या जवळपास दोन तासांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ला आणि ‘सिंदूर अभियान’ यांच्या संबंधीचा घटनाक्रम भाषणाच्या प्रारंभीच स्पष्ट केला. पाकिस्तानला त्याच्या दु:साहसाची किंमत त्याच्या कल्पनेपेक्षाही अधिक प्रमाणात भोगावी लागेल, असा इशारा आम्ही पहलगाम हल्ला झाला त्यानंतर त्वरित दिला होता. आम्ही आमच्या वेळेनुसार, आमच्या इछेनुसार आणि आम्ही ठरवू त्या स्थानी या हल्ल्याचा प्रतिशोध घेऊ, असे आम्ही स्पष्ट केले होते. प्रतिशोधासाठी आम्ही आमच्या सेनादलांना पूर्ण मुभा आणि स्वातंत्र्य दिले होते. आमच्या पराक्रमी सेनादलांनी आपली कामगिरी अत्यंत उत्कृष्टपणे आणि अचूकपणे पार पाडली असून त्यामुळे साऱ्या देशाची मान गर्वाने उन्नत झाली आहे. नव्या भारताचे हे दर्शन सुखावह आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
विरोधकांवर टीकेचे प्रहार
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर, विशेषत: काँग्रेसवर टीकेचे जोरदार प्रहार केले. काँग्रेसचा आपल्या देशाच्या सरकारवर नाही, तर पाकिस्तानच्या अपप्रचारावर विश्वास आहे. सिंदूर अभियानात पाकिस्तानला धडा शिकविल्यानंतर भारतातील विरोधी पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहून एकात्मतेचे दर्शन घडविण्याची आवश्यकता होती. तथापि, त्यांनी पाकिस्तानची भाषा बोलण्यास प्रारंभ केला होता. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये मोठी प्रसिद्धी देण्यात येत होती. पण भारतात मात्र, या पक्षांचे हसे होत होते. सेनेच्या पराक्रमावरच संशय व्यक्त करुन काँग्रेसने सेनेचे मनोबल खचविण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे पाकिस्तानचे मनोधैर्य मात्र वाढत होते, हे या देशाचे दुर्दैव आहे, अशी व्यथाही त्यांनी यावेळी बोलून दाखविले.
व्हान्स यांचा दूरध्वनी
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी ‘सिंदूर अभियाना’च्या काळात दूरध्वनी करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे, असा संदेश दिला होता. मात्र, पाकिस्तानने असे केल्यास त्याला आम्ही याहीपेक्षा मोठा धडा शिकविणार आहोत, असे प्रत्युत्तर मी दिले होते. त्यामुळे हे अभियान आम्ही आमच्या इच्छेनुसार चालविले आणि थांबविले. आमच्यावर कोणाचाही दबाव नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.
बव्हंशी देशांचा भारताला पाठिंबा
पहलगाम हल्ल्यानंतर आणि भारताच्या ‘सिंदूर अभियाना’च्या काळात भारताला जगाने नाकारले होते, या विरोधी पक्षांच्या आरोपाची त्यांनी खिल्ली उडविली. केवळ तीन देश वगळता, इतर सर्व देशांनी भारताला पाठिंबा दर्शविला. आम्ही पाकिस्तानविरोधात जी कार्यवाही केली, तिला कोणत्याही देशाने विरोध केला नाही, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे आणि आरोप करताना व्यवस्थित माहिती घेऊन ते करावेत अशीही खोचक सूचना त्यांनी विरोधी पक्षांना केली.
काँग्रेसमुळेच ही स्थिती
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्वरित भारताने देशाची संरक्षण शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला असता, तर देशाची स्थिती अधिक उत्तम राहिली असती. त्यावेळच्या नेत्यांच्या अनाकलनीय धोरणांमुळे भारताने काश्मीरचा मोठा भाग गमावला. आज पाकव्याप्त काश्मीर केव्हा मिळविणार, असा प्रश्न आम्हाला त्याच पक्षाचे लोक विचारीत आहेत. ही दांभिकता आहे. संरक्षण क्षेत्रात देश दुर्बल राहिल्याने देशाने मोठा भाग गमावला, हे विरोधकांचेच अपश्रेय असल्याची टीका त्यांनी केली.
लोकांना भ्रमित करण्याचे प्रयत्न
सारा देश ‘सिंदूर अभियाना’मुळे गर्वोन्नत झाला असताना, विरोधकांनी मात्र, जनतेला भ्रमित करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. विरोधकांचा ‘अजेंडा’ पाकिस्तानातून ठरविला जात आहे. काँग्रेस पक्ष कितकी दशके सत्तेवर राहिला असूनही त्याचा अधिकृत संस्थांवर विश्वास नाही. त्याला देशाच्या शत्रूंचा शब्द अधिक महत्वाचा आणि विश्वासार्ह वाटतो. तथापि या देशाची जनता सूज्ञ असून विरोधकांच्या या प्रयत्नांना ती दाद देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तीन्ही कारवायांवर संशय
उरी हल्ला. पहलगाम हल्ला आणि नंतर पहलगाम हल्ला या तीन्ही घटनांनंतर आम्ही पाकिस्तानला धडा शिकविला आहे. तथापि, विरोधकांनी या सर्व कारवायांवर संशय व्यक्त करण्याखेरीज काही केले नाही. विरोधक सत्तेवर असताना असे प्रत्युत्तर देण्याचे धाडस त्यांना झाले नव्हते. ते आम्ही करत आहोत, हा नव्या भारताचा निर्धार आहे. भारताच्या स्वदेशी शस्त्रांनी ‘सिंदूर अभियाना’त जो पराक्रम गाजवला त्यामुळे आमच्या शस्त्रांना आज जगभर मागणी वाढली आहे. आमच्या आत्मनिर्भरतेच्या धोरणाला मिळालेला हा उत्साहवर्धक प्रतिसाद आहे. पुढच्या काळातही आम्ही देशाला अशाच प्रकारे सामर्थ्यवान बनविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, असे नव्या भारताचे धोरण त्यांनी भाषणात स्पष्ट केले.
कोणाचीही मध्यस्थी नाही
भारताने या अभियानात पाकिस्तानचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या बाजूने उभे राहणे योग्य मानले. पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारताने त्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानचे 11 वायुतळ आणि लष्करी आस्थापने आम्ही नष्ट केली. हा तडाखा जेव्हा त्या देशाला असह्या झाला, तेव्हा त्याने हल्ले थांबविण्याची विनंती केली. तोपर्यंत भारताचे या संघर्षामागचे उद्दिष्ट्या पूर्ण झाले होते. त्यामुळे भारताने शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य केला. यामध्ये आम्ही कोणाचीही मध्यस्थी स्वीकारलेली नाही, हे स्पष्ट आहे, अशी वस्तुस्थिती त्यांनी भाषणात स्पष्ट केली आहे.
सरकारचे समर्थन, विरोधकांचे तांडव…
- पाकिस्तानच्या अणुधमकीला न जुमानता घेतला पहलगाम हल्ल्याचा प्रतिशोध
- गेल्या 10 वर्षांमधील आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नांमुळे ‘सिंदूर अभियान’ यशस्वी
- या यशाचे श्रेय सेनादलांना. त्यांच्या संयुक्त कार्यवाहीमुळे सर्व उद्दिष्ट्यो साध्य
- भारताच्या स्वदेशी शस्त्रांची पाकिस्तानला जरब, साऱ्या जगात त्यांची चर्चा
- ‘सिंधू ते सिंदूर’ असे पाकिस्तानवर चहूबाजूंनी प्रहार, भविष्यातही हेच धोरण
- भारताची कळ काढल्यास भारत काहीही करु शकतो,ही पाकिस्तानची चिंता
- विरोधकांचे धोरण सेनेचे मनोबल खच्ची करण्याचे, पाकिस्तानला बळ देण्याचे
- विरोधकांचा अजेंडा पाकिस्ताकडून ठरविला जावा, हे या देशाचे मोठे दुर्दैव
- शस्त्रसंधीनंतरही पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा आम्ही जगभर केला पर्दाफाश









