क्रीडा क्षेत्रातील कुस्ती, बॉक्सिंग यासारखे काही खेळ आजही पुऊषी वर्चस्वाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळेच इतर खेळांपेक्षा शारीरिक क्षमतेचा अधिक कस लागणाऱ्या या खेळांकडे वळणाऱ्या मुलींची संख्या तशी कमीच. अशाच खेळांपैकी एक असलेला पॉवरलिफ्टिंगही त्याला अपवाद नाही. याच पुऊषी वर्चस्वतेच्या खेळावर पकड मिळवत वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गावची सुकन्या प्रसन्ना परब पॉवरलिफ्टिंगमध्ये यशाचे एक एक शिखर सर करत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत बक्षिसे पटकावित आहे. बॉक्सिंगसारख्या खेळात स्पर्धकाला एकमेकांशी लढावे लागते. प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपले डावपेच ठरवावे लागतात. परंतु, पॉवरलिफ्टिंगमध्ये मात्र स्वत:ला स्वत:शी झुंजावे लागते आणि खरा कस लागतो तो इथेच. त्यामुळे आपल्या शारीरिक क्षमतेचा कस दाखवत तिची या खेळात असणारी आवड पाहता तिने उद्या देशाचे प्रतिनिधीत्व केले तर नवल वाटायला नको…
असा सुरू झाला पॉवरलिफ्टिंगचा प्रवास
प्रसन्ना परब ही सध्या सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. शालेय जीवनात तिसरीत असल्यापासून कराटे आणि ज्युडो यामध्ये प्रसन्ना हिरिरीने भाग घेत असे. त्यानंतर मंगेश घोगळे या प्रशिक्षकांनी तिला पॉवरलिफ्टिंग क्रीडा प्रकारात येण्यास प्रोत्साहित करून मार्गदर्शनही केले. आजवर प्रसन्ना हिने ज्या-ज्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि विजय मिळविला त्यात मंगेश घोघळे यांचा मोलाचा वाटा आहे, असे ती आवर्जुन सांगते. आजवर प्रसर्न्न हिने देश पातळीवरील तीन स्पर्धांमध्ये भाग घेतला असून 12 राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. तसेच जिल्हास्तरीय अनेक स्पर्धांमध्ये तिने यश संपादन केले आहे.
फिटनेसकडे विशेष कल
पॉवरलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात शरीर तंदुऊस्त असणे गरजेचे असते. यासाठी स्वत:ला फिट ठेवावे लागते. दररोजच्या व्यायामाला आणि वर्कआऊटला महत्त्व आपण देते. स्पर्धा जसजशी जवळ येते त्याआधी घेतला जाणारा आहार रचनात्मक पद्धतीत घेतला जातो आणि फिटनेसकडे पुरेपूर लक्ष दिले जाते. पॉवर लिफ्टिंग करताना बऱ्याचदा छोट्या-छोट्या दुखापती होत असतात. त्यामुळे फिटनेसकडे लक्ष देणे भागच असते, असे तिने सांगितले.
पॉवरलिफ्टिंग कसा खेळला जातो?
स्कॉट, बेंच आणि डेडलिफ्ट या तीन इव्हेंटच्या माध्यमातून पॉवर लिफ्टिंग खेळले जाते. स्कॉट या प्रकारात वजन पाठीवर घेऊन खाली बसून उचलले जाते. बेंच प्रेस या प्रकारात झोपून वजन उचलले जाते. तर डेड लिफ्ट या प्रकारात खालून वर वजन उचलले जाते. यामध्ये नऊ फेऱ्या पूर्ण केल्यानंतर जो सर्वाधिक स्कोअर असतो त्यावरून रँक ठरविली जाते.
पॉवरलिफ्टिंगमध्ये स्ट्रेचिंग व्यायामाला महत्व
पॉवर लिफ्टिंगमध्ये दुखापत होऊ नये, यासाठी स्ट्रेचिंग व्यायामाला महत्व दिले जाते. कारण यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते आणि त्यांचा टोनदेखील सुधारतो. कारण बऱ्याचदा लिफ्टिंग दरम्यान स्नायूंमध्ये वेदना होत असतात. यावेळी स्ट्रेचिंग व्यायाम गरजेचा असल्याचे प्रसन्ना हिने सांगितले.
वजनी गटाप्रमाणे केले जाते डाएट
पॉवरलिफ्टिंगमध्ये वजनी गटाप्रमाणे डाएटचे नियोजन केले जाते. आपण कुठल्या वजनी गटात बसतो ते पाहूनच डाएट करावे लागते. आपल्या वजनी गटापेक्षा क्रीडापटूचे वजन अधिक असेल तर त्याप्रमाणे वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करावा लागतो. शिवाय ज्यांचे वजन कमी असते त्यांनाही ताकदीसाठी वेगळ्या पद्धतीचा आहार घ्यावा लागतो. त्यामध्ये अंडी, चिकन, भाज्यांचे सॅलेड, भात त्यांचा आहारात वेटलिफ्टरना समावेश करावा लागतो.
घरच्यांच्या प्रोत्साहनामुळे पॉवरलिफ्टिंगमध्ये
या क्षेत्रात येण्यासाठी घरच्यांचा पाठिंबा माझ्यासाठी मोलाचा आहे. आई-वडील नेहमीच प्रोत्साहन देतात, असेही प्रसन्ना आवर्जून सांगते. समाजाकडून बऱ्याचदा या खेळाबाबत पुऊषसत्ताकतेचा शिक्का मारला जातो. मुलांचा खेळ मुलगी काय खेळते असे नकारात्मक बोलले जाते. परंतु, घरच्यांच्या स्वातंत्र्य आणि प्रोत्साहनामुळे आपण मेहनतीच्या जोरावर हा खेळ खेळत असल्याचे तिने सांगितले. त्याचबरोबर कॉलेजचेही सहकार्य लागते. जेव्हा स्पर्धेचा कालावधी असतो तेव्हा सरावासाठी आपणास सुट्टी दिली जाते, असेही तिने सांगितले.
क्रीडा क्षेत्रातच करिअर करण्याची इच्छा!
प्रसन्ना परब हिने आपल्याला क्रीडा क्षेत्रातच करिअर करायला आवडेल, असे ‘तऊण भारत संवाद’शी बोलताना सांगितले. मुंबई येथे ट्रेनिंग घेत असलेल्या कोच सोनाली गीते आणि नीलेश घराटे हे आपले पॉवर लिफ्टिंगमधील आदर्श आहेत. कारण हे दोन्ही कोच एशियन स्पर्धक असून वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी सहभाग नोंदविलाय. 2023 साली सोनाली गीते यांनी बेस्ट लिफ्टर ऑफ एशिया होण्याचा मान पटकाविला होता. या दोघांना नजरेसमोर ठेवत आपणही देशासाठी मेडल पटकाविले पाहिजे, अशी इच्छा असल्याची भावना प्रसन्ना परब हिने व्यक्त केली.
-अनुजा कुडतरकर, सावंतवाडी








