वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या घोषित करण्यात आलेल्या ताज्या मानांकन यादीत महिला एकेरीमध्ये भारताच्या पी. व्ही. सिंधूची घसरण झाली आहे. या मानांकनात पी. व्ही. सिंधू सध्या 17 व्या स्थानावर आहे. तिचे मानांकन पाच अंकांनी घसरले आहे. यापूर्वी ती महिला एकेरीच्या मानांकनात 12 व्या स्थानावर होती.
सिंधूला जवळपास पाच महिने दुखापतीमुळे बॅडमिंटन क्षेत्रापासून अलिप्त राहावे लागले होते. 2023 च्या बॅडमिंटन हंगामात सिंधूची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक झालेली नाही. या चालू हंगामात तिला एकही स्पर्धा जिंकता आली नाही. 14 स्पर्धांमध्ये सहभागी होताना सिंधूने 49,480 मानांकन गुण घेत 17 वे स्थान मिळवले आहे. गेल्या दशकभराच्या कालावधीतील सिंधूची मानांकनातील ही निचांकी घसरण आहे. 2016 पासून तिने महिला एकेरीच्या मानांकनात पहिल्या खेळाडूतील आपले स्थान कायम राखले होते. 2016 च्या एप्रिलमध्ये तिने मानांकनात दुसरे स्थान मिळवले होते.
पुरुष एकेरीच्या मानांकनात भारताचा एच. एस. प्रणॉय दहाव्या स्थानावर असून लक्ष्य सेन 12 व्या तर किदांबी श्रीकांत 20 व्या स्थानावर आहे. सायना नेहवाल 36 व्या स्थानावर आहे. पुरुष दुहेरीच्या मानांकनात भारताची जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी तिसऱ्या स्थानावर आहे.









