नवी दिल्ली :
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या महिला एकेरीच्या ताज्या मानांकनात भारताची अव्वल महिला बॅडमिंटनटपू पी. व्ही. सिंधूची घसरण झाली आहे. या ताज्या मानांकन यादीत सिंधू आता 15 व्या स्थानावर आहे. तिचे स्थान तीन अंकांनी घसरले आहे.
यापूर्वी ती महिला एकेरीच्या मानांकनात 12 व्या स्थानावर होती. दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने 13 स्पर्धांमधून 51070 गुण मिळवले आहेत. चालू वर्षाच्या प्रारंभी तिने या मानांकनातील पहिल्या 10 खेळाडूमधील आपले स्थान गमवले होते. दुखापतीमुळे जवळपास पाच महिने ती बॅडमिंटन क्षेत्रापासून अलिप्त होती. गेल्या वर्षीच्या ऑगस्टममध्ये तिने बर्मिंगहॅम
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपले शेवटचे सुवर्णपदक मिळवले होते. 2023 च्या बॅडमिंटन हंगामात तिने माद्रिद स्पेन मास्टर्स सुपर 300 दर्जाच्या स्पर्धेत अंतिम फेरी, मलेशिया मास्टर्स सुपर 500 स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. पुरुष दुहेरीच्या ताज्या मानांकनात भारताचे सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी तिसरे स्थान मिळवले आहे.
पुरुष एकेरीच्या ताज्या मानांकनात भारताचा एच. एस. प्रणॉय आठव्या, लक्ष्य सेन 19 व्या, किदाम्बी श्रीकांत 20 व्या, महिला दुहेरीच्या मानांकन यादीत भारताच्या ट्रेसी जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी 17 वे स्थान मिळवले आहे.









