महाराष्ट्राच्या शिरपेचात सिंधुकन्येने मानाचा तुरा खोवला आहे. तिरोडा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील सिया भोसले हिच्या चमकदार कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या बास्केटबॉलला राष्ट्रीयस्तरावर एक नवा आयाम मिळाला आहे. पुडुचेरी येथे नुकत्याच झालेल्या 16 वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय युवा बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सुवर्णपदक पटकावले आणि या विजयाची शिल्पकार ठरली सिया. महाराष्ट्र संघाच्या सुऊवातीच्या पाच खेळाडूंमध्ये सातत्याने आपले स्थान टिकवून सियाने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तिच्या उत्कृष्ट खेळाचे फळ म्हणून तिला भारतीय 16 वर्षांखालील मुलींच्या बास्केटबॉल संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले. चेन्नईमधील राष्ट्रीय क्रीडा केंद्रात 18 मे ते 11 जूनदरम्यान झालेले हे शिबीर आगामी एAँA ळ16 चॅम्पियनशिप 2025 आणि आशियाई बास्केटबॉल स्पर्धेच्या निवडीसाठी अत्यंत महत्वाचे होते. सियाने या शिबिरातही आपली छाप पाडली आणि ती आता भारतीय संघाच्या अंतिम पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्याच्या शर्यतीत आहे.
खेळातील आवड आणि कौटुंबिक वारसा
सियाचा खेळातील प्रवास लहानपणापासून सुरू झाला. अनेक खेळांमध्ये तिने कौशल्य आजमावले. टेनिस, स्केटिंग, पोहणे, वॉल क्लायंबिंग, अॅथलेटिक्स आणि अर्थातच बास्केटबॉल यासारख्या खेळांची तिला आवड आहे. सियाचे कुटुंब हे खऱ्या अर्थाने ‘खेळाडूंचे कुटुंब’ आहे. तिच्या वडिलांनी, प्रतापसिंह भोसले यांनी, शालेय काळात गोव्याच्यावतीने राष्ट्रीयस्तरावर डायव्हिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. सियाचे आजोबा आणि त्यांची भावंडं सैनिक स्कूलमधून शिकलेली असून ती आपापल्या काळात नामांकित खेळाडू होती. आजोबा कर्नल सुभाष भोसले यांची सैनिकी पार्श्वभूमी असल्यामुळे घरात शारीरिक तंदुऊस्तीला नेहमीच प्राधान्य दिले गेले. अशा खेळाडूंच्या कुटुंबात वाढल्यामुळे सियाला खेळाची आवड उपजतच मिळाली. त्यांना मिळालेले यश पाहून सियालाही प्रेरणा मिळाली आणि तिनेही खेळाला आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
मेहनतीचा प्रवास : शाळा, क्रीडा आणि समर्पण
सियाने काही वर्षांपूर्वी बास्केटबॉलला गंभीरपणे घेण्यास सुऊवात केली. ती प्रमाणित प्रशिक्षक अर्णिका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे सराव करते. पुण्याच्या डेक्कन जिमखाना क्लबमध्ये खेळताना तिला अनेक राष्ट्रीय खेळाडूंसोबत सराव करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे तिच्या खेळात आणखी सुधारणा झाली. सध्या ती विद्या वॅली स्कूल सुस, पुणे येथे शिकते, जिथे अभ्यासाबरोबर खेळांनाही तितकेच महत्व दिले जाते. शाळेच्या बास्केटबॉल संघात एक सदस्य म्हणून सुऊवात करून नंतर कर्णधार होणे आणि अखेर भारताच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड होणे, हा सियाने सातत्याने केलेल्या मेहनतीचा आणि समर्पणाचा प्रवास आहे. सकाळी लवकर उठून सराव करणे, शाळेतून परतल्यावर पुन्हा मैदानावर जाणे आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणे, हे तिचे दिनक्रम बनले आहेत. सियाच्या या प्रवासात तिची शाळा आणि प्रशिक्षक यांनी तिला खूप मदत केली. शाळेने तिच्या अभ्यासाचे आणि खेळाचे वेळापत्रक जुळवून देण्यासाठी लवचिकता दाखविली. तर प्रशिक्षक अर्णिका पाटील यांनी तिच्या क्षमतेला योग्य दिशा दिली.
समतोल साधत स्वत:ला घडविले
प्रशिक्षण, शिबिरे, स्पर्धा, अभ्यास, कौटुंबिक कार्यक्रम या सर्वांमध्ये समतोल राखत सियाने आपला प्रवास सुरू ठेवला आहे. वाढदिवस, समारंभ, सुट्ट्या, पार्टीज यापासून दूर राहून ती फक्त खेळासाठी झटत राहिली. परीक्षांच्या दिवशीसुद्धा सराव आणि फिटनेससाठी तिने ‘हो’ म्हटले. आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तिने अनेक गोष्टींचा त्याग केला आणि म्हणूनच ती आज या उंचीवर पोहोचली आहे. पूर्वी सिया अगदी लाजरी, गोंधळलेली मुलगी होती. पण आज ती आत्मविश्वासपूर्ण, नेतृत्वक्षम आणि प्रेरणादायी विद्यार्थिनी बनली आहे. तिच्या या व्यक्तिमत्व बदलाचे श्रेय तिच्या खेळाला जाते. बास्केटबॉलने तिला केवळ मैदानावरच नाही, तर जीवनातही कणखर बनविले आहे. 2025-26 साठी तिला तिच्या शाळेच्या स्पोर्ट्स प्रीफेक्ट या पदासाठी निवडण्यात आले आहे.
पराभवातून शिकलेली, यशासाठी सज्ज
भारतीय संघाच्या अंतिम पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्याच्या शर्यतीत असूनही काही प्रशासकीय कारणांमुळे तिला अंतिम संघात स्थान मिळू शकले नाही. मात्र, हा अनुभव तिला खचून न करता आणखी मजबूत आणि प्रेरित करून गेला. हा तात्पुरता अडथळा तिच्या जिद्दीला धक्का लावू शकला नाही. उलट, तो तिच्यासाठी एक शिकवणी ठरला, ज्यामुळे ती भविष्यात आणखी चांगले प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाली. सध्या ही 15 वर्षांची कन्या, जी तिरोडा-सावंतवाडीची लेक आहे. वुमेन्स नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन, ‘युएसए’मध्ये खेळण्याचे तिचे स्वप्न आहे. या असोसिएशनमध्ये खेळणे हे कोणत्याही बास्केटबॉलपटूचे अंतिम स्वप्न असते आणि सिया हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक दिवसाला एक संधी मानून खेळते. ती जागतिक स्तरावर भारताचे आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी उत्सुक आहे.
खेळासाठी सगळ्यांची साथ
सियाच्या प्रवासात तिला प्रशिक्षक, शिक्षक, मित्र, सहकारी, आप्तेष्ट, वरिष्ठ आणि अगदी अपरिचित लोकांनीही वेळोवेळी प्रोत्साहन दिले. तिच्या या यशात तिच्या कुटुंबाचा, विशेषत: तिच्या आई-वडिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी तिला नेहमीच पाठिंबा दिला, तिच्या स्वप्नांना प्रोत्साहन दिले आणि तिला आवश्यक सर्व मदत केली. तिच्या प्रशिक्षकांनी तिच्यातील क्षमता ओळखली आणि तिला योग्य मार्गदर्शन केले. मित्र आणि सहकाऱ्यांनी तिला सराव करताना आणि स्पर्धांमध्ये नेहमीच पाठिंबा दिला. सियाची ही कामगिरी महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी एक महत्वाचा टप्पा आहे.
-विजय देसाई, सावंतवाडी









